देहूरोड : चिंचोली परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासह जुन्या विद्युतवाहिन्या व तारा तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
चिंचोली परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः मासिक बिल वेळेवर आणि नियमित वसूल करणाऱ्या महावितरणकडून ग्राहकांना मात्र अखंडित वीजपुरवठा देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
परिसरातील जुन्या विद्युतवाहिन्या व तारा जीर्ण झाल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे जीर्ण वाहिन्या व तारा तातडीने बदलून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात चिंचोली (देहूरोड कॅन्टोन्मेंट) परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणच्या भोसरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर केले. निवेदनावर सरला गायकवाड , बाळासाहेब जाधव , राहुल गायकवाड, संजय सावंत ,ऍड.प्रमोद दळवी ,सुरेखा तोरणे ,आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा:
वीजपुरवठ्याचा प्रश्न केवळ तात्पुरत्या दुरुस्तीने न सोडवता जुन्या वाहिन्या बदलून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन आता या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे चिंचोली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चिंचोलीत वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; ग्रामस्थांचा महावितरणला निर्वाणीचा इशारा
ग्रामस्थांचा महावितरणला निर्वाणीचा इशारा. एक आठवड्यात वीज पुरवठा सुरळीत करा.