Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 26 September 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।

मानवी आयुष्याची किंमत आणि वेळेचे महत्त्व समजून घ्या. संसाराच्या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून माणूस आपले मौल्यवान आयुष्य संपवतो.

अभंग क्रमांक: ४२
हरिच्या जागरणा । जातां कां रे न ये मना ॥१॥
कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेंचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥3॥
तुका म्हणे बरा ।लाभ काय तो विचारा ॥4॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
_______________________
या अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्याला मानवी आयुष्याची किंमत आणि वेळेचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगत आहेत. संसाराच्या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून माणूस आपले मौल्यवान आयुष्य कसे वाया घालवतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
चांगल्या कामात मनाचा आळस:
तुकोबाराय विचारतात, अरे माणसा! रात्री उशिरापर्यंत जागून गप्पा मारायला, खेळायला किंवा संसाराच्या कामाला तुझे मन लगेच तयार होते; मग भगवंताच्या भजनाला, कीर्तनाला किंवा चांगल्या विचारांच्या 'जागरणाला' जायला तुझ्या मनात आळस का येतो बरे?
वेळेचे मोठे नुकसान (आयुष्य वेंचे फुकासाठी):
आपला प्रत्येक श्वास कमी होत आहे आणि आपले वय पाण्याचा घडा गळत असल्यासारखे 'फुकासाठी' (व्यर्थ) संपत चालले आहे. आजच्या काळात आपण याचे जिवंत उदाहरण पाहतो— सकाळी उठल्यापासून लोक चौका-चौकात किंवा चहाच्या टपरीवर जमा होतात. तासनतास "कोणता राजकीय पक्ष बरोबर आणि कोणता नेता चूक" यावर निरर्थक वाद घालतात. या वादातून जीवाभावाच्या मित्रांमध्ये नात्यांमधे कटुता येते. पण विचार करा, ज्या नेत्यांची आपण एवढी काळजी करतो, त्यांना आपली काळजी,चिंता आहे का? हा झाला आयुष्याचा फुकाचा व्यय. एकदा गेलेली ही वेळ (तुटी) पुन्हा कधीही भरून निघणार नाही.
तुकोबारायांचे जीवन चरित्र आणि जगाचा अनुभव:
तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्यासाठी तू तुझे आयुष्य आणि शांतता पणाला लावतोस, ज्यांच्यामध्ये तुझी 'गुंती' (अति-आसक्ती) आहे, ते शेवटी तुला 'मोकलिती अंतीं' (संकटसमयी किंवा मृत्यूनंतर) सोडून देतील.स्वतः तुकोबारायांच्या आयुष्यात जेव्हा मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्यांचे थोरले भाऊ घर सोडून निघून गेले. हसते खेळते कुटुंब विखुरले. संकट काळात जगाचा हाच स्वभाव असतो, हे महाराजांनी स्वतः अनुभवले होते. म्हणून ते म्हणतात, तात्पुरत्या पाशात अडकू नका.
जीवनाचा खरा नफा-तोटा :
संत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात, आता तरी शांतपणे विचार कर. संसारीक निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवून नुकसान करून घेण्यात शहाणपण आहे, की नामस्मरण करून स्वतःच्या मनाला शांत करण्यात (खरे वैकुंठ मिळवण्यात) खरा 'लाभ' आहे? जो हा विचार करेल, तोच खरा शहाणा!
रामकृष्णहरी!
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.