Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 13 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

खरा धर्म हा पैशात किंवा अवडंबरात नसून आपल्या दैनंदिन आचारात दडलेला आहे. परस्त्रीला माता मानणे, परनिंदा टाळणे, संतांवर विश्वास ठेवणे, सत्य बोलणे आणि मुखात सतत नामस्मरण ठेवणे, या पाच सहज गोष्टींमुळेच माणसाचे जीवन देवस्वरूप बनते.

देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ६१
पराविया नारी माउली समान ।
मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा परद्रव्य अभिलास ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायीं म्हणतां रामराम ।
काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥
संताचे वचनीं मानितां विश्वास ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥
खरें बोलतां कोण लागती सायास ।
काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठी ।
आणिक तें आटी न लगे कांहीं ॥५॥

___________________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
___________________________
जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगात देवप्राप्तीचा आणि सुखी जीवन जगण्याचा एक अत्यंत सोपा, बिनखर्चीक आणि शाश्वत मार्ग दाखवत आहेत. अनेक लोकांचा असा भ्रम असतो की देवासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो किंवा गुहेत कठीण साधना करावी लागते. परंतु, महाराज समाजाला अंतर्मुख करत विचारतात की, केवळ तुमचे आचरण शुद्ध ठेवण्यासाठी तुमचा कोणता पैसा खर्च होतो किंवा कोणते कष्ट पडतात?
परस्त्रीचा आदर आणि वासनेचा त्याग:
अभंगाच्या सुरुवातीलाच तुकोबाराय नीतिमत्तेचा पाया मांडतात:
"पराविया नारी माउली समान।
मानिलिया धन काय वेचे ॥"
दुसऱ्याच्या पत्नीला किंवा परस्त्रीला स्वतःच्या मातेसमान (आईसारखे) मानण्यासाठी तुमच्या खिशाती एकही पैशाचा खर्च होतो का? तसेच प्रपंचात वागत असताना कोणाची 'परनिंदा' न करणे आणि 'परद्रव अभिलाषा' (दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा न ठेवणे) यासाठी तुमचे काय नुकसान होते?
तुकोबारायांनी हा केवळ उपदेश केला नाही, तर तो स्वतःच्या आयुष्यात तंतोतंत जगून दाखवला. एकदा एक कुविचारी स्त्री महाराजांचे रूप आणि कीर्ती पाहून मोहाने आणि मदन भावनेने व्याकुळ होऊन त्यांच्या एकंतात आली. तिने आपली वासनायुक्त इच्छा महाराजांसमोर प्रकट केली.
अशा वेळी महाराज क्रोधीत झाले नाहीत, की मोहाने ढळले नाहीत. त्यांनी तिच्याकडे अत्यंत करुणेने पाहिले आणि तिला "माते" (आई) म्हणून हाक मारली. तिच्या पतनाची दया येऊन महाराजांनी तिथेच आपला अमर अभंग रचला:
"पराविया नारी रखुमाईसमान ।
हें गेलें नेमून ठायींचें चि ॥"
"जाई वो तूं माते न करीं सायास ।
आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥"
महाराजांनी तिला सांगितले की, "हे माते, माझ्यासाठी प्रत्येक परस्त्री ही साक्षात विठ्ठलाची पत्नी 'रखुमाई माऊली' समान आहे. आम्ही विठ्ठलाचे दास आहोत, त्यामुळे तू हा चुकीचा प्रयत्न करू नकोस." हा मातृभाव पाहून ती स्त्री लज्जित झाली आणि महाराजांच्या चरणी लीन झाली. संत तुकाराम महाराजांचे चारित्र्य किती पवित्र आहे, याचा हा जिवंत पुरावा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श:
इतिहासातील सुवर्ण सत्य असे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे परम प्रिय शिष्य होते.
छत्रपती शिवरायांनी लोहगडाच्या पाठीमागे भामचंद्र डोंगरावर आणि देहू गांव येथे जाऊन तुकोबारायांचे कीर्तन ऐकले होते आणि त्यांना आपले गुरू मानले होते.
जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांसमोर नजराना म्हणून आणले गेले, तेव्हा शिवरायांनी आपल्या गुरूंच्या म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या याच दिव्य आचाराचा आदर्श जगासमोर ठेवला. आपले गुरू तुकोबांच्या विचारांवर चालत शिवराय म्हणाले,
"अशीच अमुची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो..."
परस्त्रीला मातेसमान मानण्याची हीच ती संतांची आणि त्यांच्या छत्रपती शिष्याची पावन संस्कृती आहे.
"बैसलिये ठायीं म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥"
महाराज विचारतात, देवाचे नाव घेण्यासाठी तुम्हाला कुठे जंगलात जाण्याची किंवा डोंगर पोखरण्याची गरज नाही; तुम्ही जिथे आहात तिथे 'बैसलिये ठायी' (एका जागेवर बसून) शांतपणे 'रामराम' किंवा 'विठ्ठल विठ्ठल' म्हणा. या नामस्मरणाने शरीराला कोणते कष्ट किंवा श्रम होणार आहेत?
तसेच, संतांच्या हितोपदेशावर आणि त्यांच्या 'वचनांवर विश्वास' ठेवल्याने तुमचे काही नुकसान होते काय? आणि तोंडातून 'खरे (सत्य) बोलण्यासाठी' कोणते सायास (कष्ट) करावे लागतात? उलट खोटे बोलण्यासाठी माणसाला शंभर युक्त्या लढवाव्या लागतात, खरे बोलणे तर अत्यंत सोपे आणि नैसर्गिक आहे. भगवंताचे नाव घेणे आणि शुद्ध आचरण ठेवणे हाच मोक्षाचा सर्वात सोपा मार्ग आहे,
शेवटच्या चरणात तुकोबाराय परमार्थाचा अंतिम निष्कर्ष मांडतात:

"तुका म्हणे देव जोडे याचसाठी ।
आणिक तें आटी न लगे कांहीं ॥"
तुकाराम महाराज अत्यंत खात्रीने सांगतात की, साक्षात परमेश्वराची प्राप्ती केवळ आणि केवळ याच शुद्ध आचरणामुळे आणि पवित्र अंतःकरणामुळे होते. देवाला मिळवण्यासाठी इतर कोणत्याही अवघड कर्मकांडाची, यज्ञयागाची किंवा शारीरिक कष्टांची मुळीच आवश्यकता भासत नाही.
खरा धर्म हा पैशात किंवा अवडंबरात नसून आपल्या दैनंदिन आचारात दडलेला आहे. परस्त्रीला माता मानणे, परनिंदा टाळणे, संतांवर विश्वास ठेवणे, सत्य बोलणे आणि मुखात सतत नामस्मरण ठेवणे, या पाच सहज गोष्टींमुळेच माणसाचे जीवन देवस्वरूप बनते. हेच विचार अंगी बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू .