Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 23 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

माणसाच्या चित्तात (मनात) जसा भाव किंवा हेतू असेल, तसेच त्याला परमार्थिक फळ मिळते. मनात कपट आणि वरवर पूजा असेल तर आत्मघात होतो.

देहू संतवाणी*
अभंग क्रमांक: ७१
करावी तें पूजा मनेंचि उत्तम ।
लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें ।
कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु.॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात ।
फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥३॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान ।
ऐसें तें भजन पार पावी ॥४॥
______________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
______________________
परमार्थात बाह्य भपका, अवडंबर आणि जगाला दाखवण्याचा लौकिक यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता आणि मानसिक भाव श्रेष्ठ आहे.
करावी तें पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥
मनात देवाविषयी प्रेम नसताना शरिराने किंवा केवळ गंध, धूप, दीप, फुले,आरती नैवद्य इ. बाहय साधनांचा वापर करून अवाढव्य थाट मांडून केलेली पूजा ही खरी पूजा नव्हे. करायचीच असेल, तर ती पूजा अंतःकरणातून, मनोभावे आणि उत्तम रीतीने झाली पाहिजे.
समाजात आपली प्रतिष्ठा वाढावी, लोकांनी आपल्याला 'मोठा धार्मिक' म्हणावे या हेतूने (लौकिकासाठी) केलेले कोणतेही कर्म व्यर्थ आहे. देवाला बाह्य साहित्याची गरज नाही,
कारण संपूर्ण सृष्टीच त्याची आहे. त्याला फक्त भक्ताचे निर्मळ मन हवे असते.
कळावें तयासि कळे अंतरींचें।कारण तें साचें साच अंगीं ॥
ज्या विठ्ठलाला प्रसन्न करून घ्यायचे आहे, तो अंतर्यामी आहे. आपण वरवर कितीही ढोंग केले तरी आपल्या मनात काय चालले आहे, हे त्या पंढरीरायाला अचूक कळते.
देव हा 'सत्याचा' (साच) भोक्ता आहे. भक्ताच्या अंगी जोपर्यंत आंतरिक सत्य आणि प्रामाणिकपणा येत नाही, तोपर्यंत देवाची कृपा होत नाही. बाह्य जगात आपण लोकांना फसवू शकतो, पण अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला फसवणे अशक्य आहे.
अतिशया अंतीं लाभ किंवा घात। फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अवाजवी बाह्य प्रदर्शन (अतिशय) शेवटी घात किंवा नुकसानाला कारणीभूत ठरते. जसे आपण जमिनीत बीज पेरू, तसेच फळ झाडाला येते. जर बाभळीचे बीज पेरले तर आंबा कसा मिळणार? त्याचप्रमाणे,
माणसाच्या चित्तात (मनात) जसा भाव किंवा हेतू असेल, तसेच त्याला परमार्थिक फळ मिळते. मनात कपट आणि वरवर पूजा असेल तर आत्मघात होतो; आणि मनात शुद्ध भाव असेल तर भगवंतप्राप्तीचा लाभ होतो.
तुका म्हणे जेणें राहे समाधान। ऐसें तें भजन पार पावी॥
तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भक्तीने, ज्या पूजेने आणि ज्या भजनाने आपल्या अंतःकरणाला परम शांतता आणि समाधान लाभते, तेच भजन खरे आहे.
ज्या भजनाने मनातील चंचलता नष्ट होते आणि विठ्ठलचरणी लीन होता येते, तेच भजन या संसाराच्या भवसागरातून माणसाला तारून नेऊन मोक्षाच्या पैलतीरी (पार) पोहचवते.
!! रामकृष्णहरी !!
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू .