Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 04 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

आपल्या आयुष्यात जेव्हा संकटांचे घण पडतात, तेव्हा खोट्या काचेसारखे विखुरण्याऐवजी खऱ्या हिऱ्यासारखे मजबूत राहावे

देहू:
हिरा ठेवितां ऐरणीं ।वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत ।सोसी जगाचे आघात ॥३॥
______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
______________________
जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगात 'खरे' आणि 'खोटे' यातील फरक दाखवून देतात. जगात अनेक गोष्टी वरवर चांगल्या दिसतात, पण कसोटीच्या काळातच त्यांचे खरे रूप जगाच्या समोर येते. महाराज हिरा आणि मोहरा (एक प्रकारचा रत्न किंवा गंडामणी) यांचे उदाहरण देऊन खऱ्या संतांचे लक्षण सांगतात की, संतत्व हे संकटांच्या आणि जगाच्या आघातांच्या भट्टीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय सिद्ध होत नाही.
खऱ्या हिऱ्याची परीक्षा:
"हिरा ठेवितां ऐरणीं ।* *वांचे मारितां जो घणीं।।
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥"
ऐरण म्हणजे ज्या लोखंडी ठोकळ्यावर ठेवून धातू ठोकला जातो ते साधन, आणि घण म्हणजे मोठा हातोडा. खऱ्या हिऱ्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला ऐरणीवर ठेवून त्यावर घणाचे प्रहार केले जातात. जो हिरा घणाचे आघात सोसूनही फुटत नाही, तोच 'खरा हिरा' म्हणून वाचतो (टिकतो) आणि त्यालाच जगात खरे मोल मिळते.
याउलट, 'करणीचा' म्हणजे काचेपासून बनवलेला कृत्रिम किंवा खोटा हिरा वरून कितीही चमकत असला, तरी घणाचा एक छोटासा आघात होताच त्याचा 'चुरा' (चकनाचूर) होतो.
मोहरा आणि सुताचा दृष्टांत:
संत तुकाराम महाराज म्हणतात,
"मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥"
'मोहरा' हा एका प्रकारचा दुर्मिळ अग्नीरोधक मणी किंवा रत्न मानला जातो. त्याची परीक्षा अशी असते की, त्या मण्याला सुताचा दोरा गुंडाळून तो अग्नीत टाकला जातो. जर तो खरा मोहरा असेल, तर त्याच्या अंगच्या शीतल गुणामुळे त्याच्यावर गुंडाळलेले सूत (दोरा) अग्नीत असूनही जळत नाही. जर तो खोटा असेल, तर सूत लगेच जळून खाक होते. म्हणजेच, खऱ्या वस्तूच्या संगतीने नाजूक गोष्टींचेही रक्षण होते .ञजसे एकदा शांतीब्रम्ह संत
एकनाथ महाराजांवर एका यवनाने (दुष्टाने) नदीवरून स्नान करून येत असताना तब्बल १०८ वेळा थुंकण्याचा आघात केला. पण नाथांचा शांततेचा 'हिरा' फुटला नाही. प्रत्येक आघातावर त्यांनी पुन्हा-पुन्हा स्नान केले आणि उलट त्या माणसाला आशीर्वाद दिला. शेवटी तो दुष्ट नाथांच्या पाया पडला. हाच तो जगाचा आघात जो खऱ्या संतांचे मोल वाढवतो.
संतांचे लक्षण:
शेवटच्या चरणात तुकोबाराय अभंगाचा सिद्धांत मांडतात: "तुका म्हणे तोचि संत ।
सोसी जगाचे आघात ॥"
तुकाराम महाराज म्हणतात की, समाजात स्वतःला साधू किंवा श्रेष्ठ म्हणवणारे अनेक असतात. पण जो संकटात खचत नाही आणि मुख्य म्हणजे 'जगाचे आघात'—लोकांची निंदा, अपमान, छळ, सुख-दुःखाचे प्रसंग—अत्यंत शांतपणे आणि आनंदाने सोसून घेतो, तोच 'खरा संत' समजावा. संतांचे हृदय हे जगाच्या दुःखाने विरघळते, पण जगाच्या आघाताने कधी तुटत नाही.
निष्कर्ष:
आपल्या आयुष्यात जेव्हा संकटांचे घण पडतात, तेव्हा खोट्या काचेसारखे विखुरण्याऐवजी खऱ्या हिऱ्यासारखे मजबूत राहावे. कठीण प्रसंग हे माणसाचा घात करण्यासाठी येत नाहीत, तर त्याच्यातील 'सत्त्व' जागे करून त्याचे मोल वाढवण्यासाठी येतात.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्रीक्षेत्र देहू .