Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 21 September 2026

।। श्रीतुकोबाराय चैतन्य ।।

हा संसार मिथ्या (खोटा) आणि नश्वर आहे. तो जितका वाढवावा, तितका तो वाढतच राहतो

॥ अभंग क्रमांक: ३७ ॥
सुखें वोळंब दावी गोहा ।
माझें दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा ।
होय होय कैसा म्हणे भिडा ॥धृ.॥
अखंड मज पोटाची व्यथा ।
दुधभात साकर तूप पथ्या ॥३॥
दो प्रहरा मज लहरी येती ।
शुद्ध नाहीं पडे सुपती ॥४॥
नीज नये खालीं घालीं फुलें ।
जवळीं न साहती मुलें ॥५॥
अंगी चंदन लावितें भाळीं ।
सदा शूळ माझे कपाळीं॥६॥
निपट मज न चले अन्न ।
पायली गहूं सांजा तीन ॥७॥
गेलें वारीं तुम्हीं आणिली साकर ।
साता दिवस गेली साडेदहा शेर ॥८॥
हाड गळोनि आलें मास ।
माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥९॥
तुका म्हणे जिता गाढव केला ।
मेलियावरी नरका नेला ॥१0॥
______________________
।। श्रीतुकोबाराय चैतन्य ।।
______________________
या उपरोधिक आणि मार्मिक अभंगात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी संसारातील 'मायारूपी स्त्री' आणि तिच्या नादाला लागून स्वतःचे अध्यात्मिक व व्यावहारिक नुकसान करून घेणारा 'जीव' (पती) यांचे हुबेहूब चित्रण केले आहे.
मायेचे बाह्य सोंग आणि लाड:
वरवर पाहता सुख-विलासाची सवय लागलेली एक स्त्री आपल्या पतीने सतत आपले कोडकौतुक करावे, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण कराव्यात यासाठी नखरे (वोळंब) करताना दिसते. ही स्त्री म्हणजे दुसरी तिसरी काही नसून 'माया' आहे. या मायेच्या बाह्य सौंदर्यावर खुश होऊन, तिच्या मर्जीखातर तिचा नवरा तिच्या प्रत्येक हट्टाला हो, हो म्हणत 'वेडा' बनतो.
स्त्रीचे(माया) ढोंग आणि नखरे:
ती स्त्री पतीकडे तक्रार करते की, मला एकसारखी पोटाची व्यथा आहे, त्यामुळे मला रोज दूध-भात, तूप-साखर असे महागडे पथ्य लागते. दुपारी मला चक्रा (लहरी) येतात, शुद्ध हरपून मी गाढ झोपी (सुपती) जाते. मला रात्री झोप येत नाही म्हणून मी अंथरुणावर फुलांचा थर घालते. जवळ लहान मुलांची किरकिर मला सहन होत नाही. कपाळ दुखत असल्याने मला सर्वांगाला आणि कपाळाला चंदनाचा लेप लावावा लागतो.
अतिखादाडपणा आणि खोटा आळ:-
ती पुढे म्हणते, मला अन्न अजिबात पचत नाही, तरीही दिवसातून तीन वेळा मिळून 'पायलीभर' (अंदाजे ४ किलो) गव्हाचा सांजा मला लागतोच! गेल्या बाजाराच्या दिवशी तुम्ही आणलेली 'साडेदहा शेर' (अंदाजे १० किलो) साखर मी कशीतरी सातच दिवसांत संपवून पुरवून वापरली! इतके प्रचंड खाऊन ती प्रत्यक्षात खूप लठ्ठ झाली आहे, तरीही पतीची सहानुभूती मिळवण्यासाठी ती खोटे ढोंग करत म्हणते—"माझ्या शरीरातील सर्व हाडे आता नष्ट झाली असून (किंवा चरबीखाली लपली असून) शरीरात फक्त भरपूर मांस भरून राहिले आहे." माझे हे (भलतेच) दुःख तुम्हाला कसे समजत नाही?
तुकोबांचा थेट प्रहार:-
यावर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की, अशा ढोंगी आणि केवळ वासना-सुखात, खोट्या नखऱ्यांत अडकवणाऱ्या मायेच्या नादाला लागून नवरा जिवंत असतानाच 'शुद्ध गाढव' बनतो आणि मेल्यावर नरकात जातो. त्याला प्रपंचही नीट सांभाळता येत नाही आणि परमार्थही साधता येत नाही .
संकटातून परमार्थाकडे:
ही माया प्रथम माणसाला स्वतःकडे आकर्षित करते आणि नंतर आपले दुःखद वास्तव रूप दाखवते. मायेमुळे सांसारिक दुःखे येत असली, तरी ती कधीकधी परमार्थात सहायक ठरू शकतात. माणसाला सुखामध्ये देवाचा विसर पडतो, पण संकटे आणि दुःखे आली की तो सर्व काही सोडून परमेश्वराला शरण जातो. म्हणूनच, संकटांना न घाबरता त्यातून ईश्वराची भक्ती कशी साधावी, हे संत तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात सांगतात:
बरे झाले देवा निघाले दिवाळे ।
बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन ।
जाला हा वमन संवसार।।
हा संसार मिथ्या (खोटा) आणि नश्वर आहे. तो जितका वाढवावा, तितका तो वाढतच राहतो. याविषयी
श्री संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात:
लटिका संसार वाढविसी व्यर्थ ।
(तात्पर्य):
संसार-प्रपंच करीत असताना अनावश्यक विचारांना, वासनांना आणि कृतीला थारा न देता, नियमित भगवंताचे नामस्मरण करावे.
आपली सर्व कर्तव्ये उत्तम व्यवहाराने आणि एकनिष्ठेने पार पाडावीत. आषाढी-कार्तिकीची पंढरपूरची वारी चुकवू नये. सत्य कर्माने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचा समतोल साधावा, हाच या संतवाणीचा मुख्य उद्देश आहे:
सुखें करावा संसार ।
न संडावे दोन्ही वार ॥
दया क्षमा घर ।
चोजवीत येतील ॥
।। रामकृष्णहरी।।
क्रमशा:
नितीन महाराज मोरे
अध्यक्ष
संत तुकाराम महाराज संस्थान
श्रीक्षेत्र देहू.