Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 12 September 2026

भारतीय पहिले तत्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी - महानुभाव अनिल मराठे

महाराष्ट्राला धर्मक्षेत्राचे व मराठीला धर्मभाषेचे सिंहासन प्राप्त करून देणारे, महानुभाव मराठी साहित्याचे प्रेरणास्थान होते. भूतमात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार करुणा होती. त्यांच्या प्रकट दिनाविषयी..

देहू: श्री चक्रधरस्वामी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक अलौकिक विभूतिमत्व होते. जीवोद्धरणासाठी अखंड परिभ्रमण करणारे ते परमेश्वरावतार होते.
महाराष्ट्राला धर्मक्षेत्राचे व मराठीला धर्मभाषेचे सिंहासन प्राप्त करून देणारे, महानुभाव मराठी साहित्याचे प्रेरणास्थान होते. भूतमात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार करुणा होती. अनाथ-अपंगांचे व दीनदुबळ्यांचे तर ते विश्रांतिस्थान होते. संसारतापाने पोळलेल्या जीवांना, अद्वैताश्रित वेदोक्त देवतोपासनेच्या कर्मकांडातून सोडवून परमेश्वराच्या अनन्य भक्तीचा मार्ग त्यांनी उपदेशिला. त्यात गरीब-श्रीमंत, ब्राह्मण-शूद्र, स्त्री-पुरुष असा भेदभाव केला नाही. वर्णविषमतेला आणि स्पृश्यास्पृश्यतेला थारा दिला नाही. मद्यमांसादो व्यसनांचा त्याग करून माणसाने सात्त्विक जीवन जगावे, प्रयत्नांची कास न सोडता अखंड परमेश्वरस्मरण करावे, मुंगीचेही वैर चितू नये, मारिता-पूजिता समान मानावा असा मानवतेचा धर्म त्यांनी शिकविला. अहिंसाधर्माची तर ते साक्षात मूर्ती होते. 'वैरियाचा देवो जाला तरि काइ दगडे हाणौनि फोडावा ?' असे सांगून सर्वधर्मसमभावाचा व समेतेचा दिव्य संदेश त्यांनी विला. त्यांच्या या उपदेशांमुळे हादरलेल्या तत्कालीन प्रस्थापित धर्माच्या पंडितांनी त्यांचा काटा काढून टाकण्याचा अनेकदा प्रयत्न केला. या सर्व प्रसंगांना अहिंसात्मक धैर्याने सामोरे जाऊन 'हा जनु तुमते डोइये डोइये मारील तरि तुम्ही डोइचि ओडवावी' या आपल्या उपदेशाचा आपल्याच आचरणाने जो भव्योदात्त आदर्श त्यांनी निर्माण केला.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीचे अलौकिक समाजकार्य
महाराष्ट्रातील १२ व्या शतकातील धार्मिक व सामाजिक क्रांतीची प्रमुख कार्ये:
१) समता व जातीभेद निर्मूलन: वर्णावर्णत्व व जातीभेदाचे तत्व संपविले. कर्मकांड संपविले. सर्व जीव, सर्वमाणसे, स्त्री-पुरुष हे समान असून धर्माचे व उध्दाराचे अधिकारी आहेत असे प्रतिपादन केले.
२) मराठी भाषेला राजाश्रय व प्रतिष्ठा: धर्मक्षेत्रातील संस्कृत भाषेचे वर्चस्व कमी करुन सामान्यांच्या भाषेत—मराठीत विचार प्रतिपादन केले. मराठीला धर्मभाषेचा आणि साहित्याचा सन्मान दिला.
३) नैतिक मूल्यांची शिकवण: सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, परस्पर प्रेमभाव, समता, समहितता, औदार्य, साधेपणा आणि श्रमनिष्ठा या मानवी जीवन मूल्यांची परिवारास व समाजास शिकवण दिली.
४) षड्रिपूंचा त्याग: राग, द्वेष, काम, क्रोध, स्वार्थ, मोह व अहंकार यांचा त्याग करण्यास सांगितले.
५) भूतदया: सर्वभूतमात्रांना (प्राणी आणि मनुष्य) अभय देणे आणि अहिंसेचे पालन करणे.
६) स्त्री-शूद्रांना अधिकार: महाराष्ट्रात व धर्मक्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करुन आत्मोध्दारासाठी सर्व जातीवर्णाच्या स्त्री-पुरुषांना संन्यास घेण्याचा, भक्ती करण्याचा अधिकार दिला व पंथात/परिवारात प्रवेश दिला.
७) विवेकवाद: प्रयत्नवाद व ज्ञानजिज्ञासेला प्रोत्साहन दिले.
८) अंधश्रद्धा निर्मूलन: समाजातील अज्ञान आणि अंध-श्रध्दा घालविण्याचे कार्य केले.
९) ईश्वराचे सोपेपण व लोकशाही : ईश्वर प्राप्तीसाठी कोणत्याही कठीण यज्ञाची किंवा पैशांची गरज नसून, केवळ शुद्ध भक्ती, नामस्मरण आणि सदाचार यांच्या माध्यमातून सामान्य माणूसही मोक्ष मिळवू शकतो हा आत्मविश्वास समाजात निर्माण केला.
हे सर्व पाहून कोणीही त्यांच्यासमोर आदराने नतमस्तकच होईल.
महात्मा.अनिलराज मराठे महानुभाव
देहुगाव माळीनगर.