विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
______________________
वारकरी संप्रदायाचा महामंत्र आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा कळस एक अत्यंत प्रगत आणि व्यापक विचार जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज या अभंगात मांडत आहेत.
"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥
"या संपूर्ण सृष्टीत, विश्वाच्या कणाकणात एकच विठ्ठल-परमेश्वर भरून राहिला आहे हे अंतःकरणातून स्वीकारणे हाच खऱ्या 'वैष्णवांचा' (विष्णूच्या भक्तांचा) धर्म आहे. ईश्वराच्या या सुंदर जगात 'हा उंच, तो नीच, हा पापी, तो पुण्यवान' असा माणसा-माणसांमध्ये भेद करणे हा अत्यंत अमंगळ (अशुभ) भ्रम आहे.
या सिद्धांताची साक्ष आपले भागवत पुराण देते. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारले की, "तुझा हरि (देव) कुठे आहे?" तेव्हा बालभक्त प्रल्हादाने उत्तर दिले, "तो जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र आहे." जेव्हा प्रल्हादाला त्या निर्जीव लोखंडाच्या खांबातही विष्णू दिसला, तेव्हा त्याचा तो विश्वास सत्य ठरवण्यासाठी साक्षात नृसिंह भगवान प्रकट झाले. संपूर्ण जग विष्णूमय आहे, हाच भागवत पुराणाचा मुख्य गाभा आहे.
"भूतां परस्परें जडो । मैत्र जिवाचें ॥"
माऊली वैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पसायदानात विश्वात्मक देवाकडे हाच अद्वैत भाव मागत आहेत.
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥
जर तुम्हाला स्वतःचे खरे आणि अंतिम हित साधून घ्यायचे असेल, तर संसारात वागताना नेहमी सत्य आणि प्रेमळ वर्तन ठेवा. सर्व जीवांमध्ये एकच ईश्वर तत्त्व भरून राहिले आहे हे ध्यानात ठेवून कोणत्याही जीवाचा, प्राण्याचा किंवा माणसाचा 'मत्सर' (द्वेष) करू नये. कोणाचाही द्वेष न करता सर्वांवर प्रेम करणे, हेच साक्षात 'सर्वेश्वरपूजनाचे'
(देवाच्या खऱ्या पूजेचे) मुख्य वर्म म्हणजेच गुपित आहे.
"तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥
आपल्या शरीराच्या कोणत्याही एका अवयवाला- समजा पायाला जरी काटा टोचला किंवा दुखापत झाली, तर त्याचे दुःख केवळ पायापुरते मर्यादित राहत नाही. ते संपूर्ण शरीराला आणि जीवाला भोगावे लागते. पायाला काटा टोचला की डोळ्यातून पाणी येते आणि हात लगेच पायाकडे धाव घेतो. कारण सर्व अवयव एकाच शरीराचे भाग आहेत. निसर्गातील किंवा शरीरातील प्रत्येक घटक एकमेकांशी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने जोडलेला आहे. जर आपण निसर्गातील एका जरी घटकाला (उदा. झाडांना किंवा प्राण्यांना) इजा पोहोचवली, तर त्याचा दुष्परिणाम संपूर्ण मानवी साखळीवर आणि पर्यावरणावर होतो.
विश्वातील कोणत्याही जीवाचा मत्सर करणे म्हणजे स्वतःच्याच शरीराच्या अवयवावर जखम करण्यासारखे आहे,
कारण आपण सर्व एकाच विठ्ठलरूपी शरीराचे अवयव आहोत.
! !रामकृष्णहरी!!
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू .
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
विश्वातील कोणत्याही जीवाचा मत्सर करणे म्हणजे स्वतःच्याच शरीराच्या अवयवावर जखम करण्यासारखे आहे