Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 25 September 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

मनुष्य समाजात कितीही श्रीमंत, प्रतिष्ठित किंवा विद्वान असला, तरी जर त्याचे नियंत्रण परद्रव्य (लोभ), परस्त्री (वासना) आणि परनिंदा (मत्सर) या अवगुणांच्या हाती असेल, तर त्याची फजिती निश्चित

अवगुणांचे हातीं ।
आहे अवघीच फजीती ॥१॥
नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥
विष तांब्या वाटी ।
भरली लावूं नये होटीं ॥२॥
तुका म्हणे भाव ।
शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
______________________
"अवगुणांचे हातीं ।
आहे अवघीच फजीती ॥
मनुष्य समाजात कितीही श्रीमंत, प्रतिष्ठित किंवा विद्वान असला, तरी जर त्याचे नियंत्रण परद्रव्य (लोभ), परस्त्री (वासना) आणि परनिंदा (मत्सर) या अवगुणांच्या हाती असेल, तर त्याची अवघीच फजिती' (पूर्ण नाचक्की) झाल्याशिवाय राहत नाही.
राजा नहुषाची कथा:
शंभर अश्वमेध यज्ञ करून नहुष स्वर्गाचा राजा (इंद्र) बनला. त्याची पात्रता मोठी होती, पण पद मिळताच त्याच्या मनात अहंकार आणि वासना हे अवगुण जागृत झाले. या अवगुणांच्या आहारी जाऊन त्याने अगस्त्य ऋषींचा अपमान केला. परिणामी, त्याला स्वर्गातून खाली पडावे लागले आणि तो 'सर्प' (साप) बनला. अवगुणांमुळे साक्षात स्वर्गाच्या राजाचीही कशी फजिती होते, हे पुराणाने दाखवून दिले आहे.
बाह्य रूपापेक्षा अंतरंग महत्त्वाचे:
"नाहीं पात्रासवें चाड ।प्रमाण तें फिकें गोड
"विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥
धातूचे भांडे सोन्याचे आहे की तांब्याचे (बाह्य रूप) यापेक्षा त्या भांड्यात काय भरले आहे (अंतरंग) हे महत्त्वाचे आहे. जर तांब्याच्या किंवा सोन्याच्या अत्यंत मौल्यवान वाटीत 'विष' भरले असेल, तर केवळ पात्र चांगले आहे म्हणून ते ओठाला (होटीं) लावू नये, कारण ते प्राण घेईल. परमार्थातही माणसाची जात, त्याचा श्रीमंतपणा किंवा त्याचे बाह्य सोंग महत्त्वाचे नसून, त्याच्या अंतरंगातील भक्तीचा रस 'गोड' आहे की 'फिकट' आहे, हे पाहिले जाते.
विज्ञानाची सांगड:
विज्ञानाचा आणि व्यवहाराचा एक साधा नियम आहे—आपण जेव्हा एखादे औषध विकत घेतो, तेव्हा त्या औषधाची बाटली किती सुंदर किंवा चकचकीत आहे याला महत्त्व नसते; तर त्या बाटलीच्या आत असलेले केमिकल किंवा औषध रोगावर लागू पडणारे आहे की नाही, हे पाहिले जाते. बाह्य वेष्टनापेक्षा आतील घटकाची शुद्धता महत्त्वाची असते.
बाह्य रूपाची ही भुलभुलैया नाकारताना चोखोबा म्हणतात:
"ऊंस डोंगा परि रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥"
सोंग विरुद्ध शुद्ध भाव:
"तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥
परमार्थात देवाच्या नावाचे बाह्य सोंग किंवा ढोंग करणे पूर्णपणे व्यर्थ (वाव) आहे. त्यापेक्षा मनात असलेला देवाप्रतीचा 'शुद्ध भाव' लाख पटीने श्रेष्ठ आहे.
भगवान श्रीकृष्णांनी गीतेत स्पष्ट म्हटले आहे:
"पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति..."
मला छपन्न भोग नकोत, भक्ताने केवळ शुद्ध भावाने आणि भक्तीने मला एक पान, फूल, फळ किंवा पाणी जरी अर्पण केले, तरी मी त्याचा स्वीकार करतो. देवाला सोहळ्याचे सोंग नको, भक्ताचा शुद्धभाव हवा आहे.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्रीक्षेत्र देहू.