जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥
आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
______________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
_______________________
खरी भक्ती माणसाला एकांतात रडवत नाही आणि जनात भरकटू देत नाही. नामस्मरणाच्या बळावर जेव्हा आपली दृष्टी शुद्ध होते, तेव्हा हे संपूर्ण जगच भगवंताचे रूप बनते आणि जीवनात अखंड आनंदाचे कौतुक सुरू होते.
आणि नामस्मरण रक्ताच्या कणाकणात भिनते, तेव्हा भक्ताला संपूर्ण जग विठ्ठलमय दिसू लागते. या स्थितीलाच संतांनी 'विश्वची माझे घर' किंवा 'विठ्ठल जळी स्थळी भरला'
असे म्हटले आहे.
जन विजन एक होणे आणि दिव्य दृष्टी:
अभंगाच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराज म्हणतात,
"जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥"
आणि "पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥"
विठ्ठलाच्या नामाचा असा काही प्रभाव झाला आहे की, आता लोकांच्या गर्दीत (जनात) आणि एकांतात (विजनात) काहीच फरक उरलेला नाही. गर्दीतही त्यांना विठ्ठलाचीच शांतता लाभते.
संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी आता जिकडे जिकडे पाहतो, तिकडे तिकडे मला माझे लाडके आई-बाप विठ्ठल आणि रखुमाईच उभे असलेले दिसतात. संसारातील नश्वर माणसांऐवीजी त्यांना प्रत्येक रूपात देवच दिसू लागला आहे.
"वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥"
मोठे वैभवशाली नगर किंवा शहर, आणि वन म्हणजे जंगल. सामान्य माणसाला शहरात सुख आणि जंगलात भीती किंवा उदासपणा वाटतो. पण तुकोबारायांना विठ्ठलाच्या अस्तित्वामुळे वन आणि पट्टण दोन्ही सारखेच (एकभाव) वाटतात. कारण भगवंताने सृष्टीचा 'अवघा ठाव' (सर्व जागा) व्यापून टाकला आहे, त्यामुळे वाईट किंवा दुय्यम म्हणावी अशी कोणतीच जागा शिल्लक उरलेली नाही.
साखरेचा खडा पाण्यात टाकला किंवा दुधात टाकला, तरी ती प्रत्येक थेंबाला गोडच करते. त्याप्रमाणे तुकोबारायांचे चित्त विठ्ठलनामाने एवढे गोड झाले आहे की, ते वनात जावोत की जनात, त्यांना प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचाच आनंद मिळतो.
"जळी स्थळी भरला विठ्ठल । रीता ठाव नाही कोठे ॥"
अर्थात, जगात विठ्ठल नसलेली अशी एकही जागा उरलेली नाही,
"तेव्हा जन की विजन । हे उरलेची नाही भान ।"
"किंबहुना चराचर । आपणचि जाहला ॥"
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, आत्मज्ञान झालेल्या पुरुषाला जन आणि विजन हे भेद उरतच नाहीत, कारण त्याला सर्व चराचरामध्ये स्वतःचा विठ्ठलच दिसतो.
परमानंदाचे कौतुक !
"आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥"
सर्वत्र विठ्ठलच भरला आहे, तेव्हा लौकिक जगातील सुख आणि दुःखाचा आठव (आठवण) तरी कसा राहणार? द्वंद्वांचा पूर्ण विसर पडल्यामुळे तुकोबारायांचे मन बालकासारखे निष्पाप आणि आनंदी झाले आहे आणि याच कौतुकाने (प्रेमाने) ते विठ्ठलाच्या समोर नाचत आहेत.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
आत्मज्ञान झालेल्या पुरुषाला जन आणि विजन हे भेद उरतच नाहीत, कारण त्याला सर्व चराचरामध्ये स्वतःचा विठ्ठलच दिसतो