Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 24 September 2026

।। श्रीतुकोबाराय चैतन्य।।

संसारीक अन्नाची तृप्ती क्षणिक असते. दुपारी जेवले की संध्याकाळी पुन्हा भूक लागते. पण नामस्मरण आणि ब्रह्मानंदाचा रस हा कधीही न संपणारा आहे.

देवाच्या प्रसादें करा रे भोजन ।
व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट ।
नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र ।
अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥
इच्छादानी येथें वळला समर्थ ।
अवघेंचि आर्त पुरवितो ॥३॥
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं ।
पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें ।
कामारीसांगातें निरुपम ॥५॥
_______________________
।। श्रीतुकोबाराय चैतन्य।।
_______________________
जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या पाठीवरील सर्व जीवांना एका अपूर्व भोजनाचे आमंत्रण देत आहेत. संतांचे हृदय एवढे दयाळू असते की, त्यांना मिळालेला ब्रह्मानंदाचा सुखद ठेवा ते एकटे खात नाहीत, तर तो जगाला वाटतात. येथे 'भोजन' म्हणजे तांदूळ-गव्हाचे किंवा इतर अन्न नसून, 'हरिनामाचा दिव्य ब्रह्मरस' आहे.
लौकिक जगात नोकरी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी 'पात्रता' लागते. पण संतांच्या पंक्तीत बसून या नामभोजनाचा आस्वाद जो कोणी घेईल, तो आपोआप परमार्थाचा 'अधिकारी' बनतो.
संतांच्या या पंक्तीचे वर्णन करताना तुकोबाराय दुसऱ्या अभंगात म्हणतात:
"या रे या रे लहान थोर । याती भलते नारी नर ॥
शबरी मातेंकडे कोणतीही मोठी योग्यता नव्हती, सुदाम्याकडे दारिद्र्य होते. पण दोघांनी भक्तीचा प्रसाद दिला आणि घेतला, म्हणून ते प्रभू रामचंद्रांच्या आणि कृष्णाच्या दरबारात सर्वश्रेष्ठ अधिकारी बनले.
संतांचे उच्छिष्ट
ब्रह्मरसब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट ।
नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥
श्री संत तुकाराम महाराज सावध करतात की, या प्रसादाला सामान्य समजू नका. हा प्रसाद म्हणजे 'संतांचे उच्छिष्ट' आहे. उच्छिष्ट म्हणजे संतांनी स्वतः भगवंताच्या नामाचा आनंद घेतला आणि तो अनुभवून उरलेला भाग आज आपल्याला दिला आहे. ज्या सुखासाठी ब्रह्मदेव आणि शंकर देवासारखे थोर देवसुद्धा आसुसलेले असतात, ते सुख संतांच्या कृपेने आपल्याला सहज मिळत आहे. म्हणून या नामस्मरणाचा कंटाळा (वीट) करू नका.
संतांच्या उच्छिष्टाचे (कृपेचे) महत्त्व:
नारद मुनींचा पूर्वजन्म.पूर्वजन्मात नारदमुनी एका दासीचे पुत्र होते. त्यांच्या घरी चातुर्मासात काही संत आले होते. त्या संतांनी भोजन केल्यानंतर उरलेले 'उच्छिष्ट' (प्रसाद) नारदमुनींनी लहानपणी प्राशन केले. त्या संतांच्या उच्छिष्ट प्रसादाच्या महिमामुळेच एका दासीपुत्राचा 'देवर्षी नारद' झाला! इतकी ताकद या उच्छिष्टात आहे.
भक्तीचा समान अधिकार
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र ।
अधिकार सर्वत्र आहे येथें
जगातील अन्नछत्रातील अन्न संपू शकते, पण विठ्ठलाच्या भक्तीचे ताट (पात्र) असे आहे की ते जगातील सर्व जीवांना पुरून वर ओसंडून वाहत आहे. राजा असो वा रंक, विद्वान असो वा अशिक्षित, या नामविठ्ठलाच्या दरबारात सर्वांना समान अधिकार आहे.
संत चोखामेळा महाराज
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ॥"
भगवंताच्या दरबारात शरीराला किंवा जातीला महत्त्व नाही, तर केवळ अंतःकरणाच्या भावाला महत्त्व आहे. इच्छा पुरवणारा विठ्ठल इच्छादानी येथें वळला समर्थ ।
अवघेंचि आर्त पुरवितो ॥
आपला पंढरीचा विठ्ठल हा केवळ दाता नाही, तर तो 'इच्छादानी' आहे. भक्ताच्या मनात इच्छा निर्माण व्हायच्या आत तो ती पूर्ण करतो. जो भक्त ज्या आर्ततेने (व्याकुळतेने) देवाला हाक मारतो, त्याचे सकल मनोरथ विठ्ठल पूर्ण करतो.
मागितल्या दाना कष्टी नव्हे देव।
जरि त्याचा भाव अनन्य असे ॥
संत तुकाराम महाराज:
ध्रुवबाळाने पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा केली, तर समर्थ भगवंताने त्याला अढळपद दिले. द्रौपदीने आर्ततेने हाक मारली, तर पन्नास कोटी यादवांना जे वस्त्र पुरले नसते, ते अनंत वस्त्र पुरवून भगवंताने तिची लाज राखली.
चिरंतन तृप्ती
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं ।
पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें
संसारीक अन्नाची तृप्ती क्षणिक असते. दुपारी जेवले की संध्याकाळी पुन्हा भूक लागते. पण नामस्मरण आणि ब्रह्मानंदाचा रस हा कधीही न संपणारा आहे. हा रस जितका प्यावा, तितकी त्याची गोडी वाढतच जाते आणि प्रत्येक क्षणाला असे वाटते की, पुन्हा पुन्हा हाच नामरूपी घास (कवळ) घ्यावा.
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें ।
कामारीसांगातें निरुपम ॥५॥
अभंगात शेवट करताना संत तुकाराम महाराज या भोजनाचे गुपित सांगतात. या भक्ती भोजनाचा स्वयंपाक (पाक) दुसरा कोणी केला नसून, स्वतः जगज्जननी लक्ष्मीमातेने आपल्या हाताने केला आहे. आणि हा प्रसाद वाढणारा, भक्तांच्या पंक्तीत उभा राहून सेवा करणारा 'कामारी' (सेवक) कोण आहे? तर स्वतः वैकुंठपती पांडुरंग आहे! जो त्रिभुवनाचा मालक आहे, तो भक्तांच्या प्रेमापोटी त्यांचा नोकर बनला आहे. अशा मालकाच्या आणि लक्ष्मीच्या हाताचे हे भोजन खरोखरच 'निरुपम' (ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥शब्दांचीच देवू पूजा करू ।
संतांच्या घरची देवाची चाकरी.
भगवंत भक्तासाठी कधी कामारी (सेवक) बनतो? तर तो संत एकनाथ महाराजांच्या घरी 'खंड्या' बनून १२ वर्षे पाणी वाहत होता. संत जणाबाई दळू लागली की तिच्यासोबत दळण दळत होता आणि कबीर महाराजांचे शेले विणत होता. जो देव संतांचा नोकर बनू शकतो, तोच विठ्ठल आज आपल्याला हा नामरस भरवत आहे.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.