Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 28 September 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।

मनातील स्वार्थ आणि अपेक्षा सोडून देवाला शरण जातो, तेव्हा देव आपला ऋणी बनतो. विठ्ठलाचे नाम मुखात असेल, तर आयुष्यात कधीही पराभव (हार) होत नाही . मन नेहमी आनंदाने भरलेले राहते.

अभंग क्रमांक: ४४
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे ।
बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ ।
जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥
कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं ।
इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥
बैसलिये ठायीं लागलें भरतें ।
त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥
हरी नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं ।
नारायण अंगीं विसावला ।।४ ॥
तुका म्हणे बहु लाटे हें भोजन ।
नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥
______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
______________________
या विश्वातिल सर्व ज्ञान ज्याला प्राप्त आहे व कोणतेही ज्ञान त्याला प्राप्त करण्याचे शिल्लक राहिला नाही, असा स्वयं विश्वाचा निर्माणकर्ता असलेला ब्रह्मदेव ज्या विठ्ठलाच्या प्रेमरूपी लाभाला मिळवू शकला नाही (त्यालाही तो लाभ छोटा पडला/ठेंगणा वाटला), तो विठ्ठल प्रेमलाभाचा आनंद आम्हा संतांना मिळाला आहे.
का मिळाला? कारण आम्ही आमचा अहंकार सोडून देवाला संपूर्ण 'शरणागत' झालो आहोत.
"ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती ।
अव्हेरिलें संती विष्णुदासी ॥"
संतांनी कोरडे ब्रह्मज्ञान नाकारून विठ्ठलाचे सगुण प्रेम स्वीकारले .
वासनेचा त्याग आणि देवाचे ऋणी:
जेव्हा माणसाच्या मनातील 'कामनेचा' (लौकिक वासना अपेक्षा) त्याग होतो, तेव्हाच खऱ्या भजनाचा लाभ होतो. जेव्हा भक्त देवाकडे स्वतःसाठी काहीही मागत नाही, तेव्हा स्वतः 'पद्मनाभ' (परमेश्वर) त्या भक्ताच्या प्रेमाचा आणि सेवेचा 'ऋणी' (कर्जदार) बनतो.
कामधेनू सारखा प्रेमाचा वर्षाव:
समुद्रमंथनातून निघालेल्या दिव्य कामधेनूच्या दुधाला (क्षीर) जसा अंत नाही, ती याचकाच्या इच्छेप्रमाणे दुधाचा वर्षाव करते; तसाच आपला पांडुरंग आहे. भक्त ज्या प्रेमाने, ज्या भावाने देवाची इच्छा करेल, तसा देवाच्या कृपा-प्रेमाचा वर्षाव भक्तावर अखंड होत राहतो.
बसल्या जागी ब्रह्मानंदाचे भरते:
भक्तीच्या बळावर कुठेही वनात किंवा डोंगरावर भटकण्याची गरज नाही. 'बैसलिये ठायीं' (आहोत त्याच जागी) आनंदाचे महापूर (भरते) येते. तिथे देणारा, घेणारा आणि मधली गोष्ट (ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान किंवा ध्याता-ध्यान-ध्येय) हा भेदमावळून जातो. भक्त आणि देव एकरूप होतात.
हरी नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं ।
नारायण अंगीं विसावला ।।
आम्ही विठ्ठलाचे दास (विष्णुदास) आहोत, आमच्या मुखात हरीचे नाम असल्यामुळे आम्हाला जीवनात कधीही 'हार (पराभव) माहीत नाही. विठ्ठलाने आमच्या देहात, आमच्या संपूर्ण 'अंगी' विसावा घेतला आहे.
जेव्हा रामेश्वर भटांच्या सांगण्यावरून तुकोबारायांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले गेले, तेव्हा व्यावहारिक जगात तुकोबारायांची 'हार' झाली असे लोकांना वाटले, पण तेरा दिवस ते इंद्रायणी नदीकाठी
'बैसलिये ठायीं' (बसल्या जागी) ध्यानाला बसले.
त्यांच्यात विठ्ठल विसावला होता. शेवटी देव स्वतः विठ्ठल
बनून आला आणि पाणी असूनही गाथा कोरड्या बाहेर काढल्या .
विठ्ठलाच्या दासाची कधीही 'हार' होत नाही, हे महाराजांनी चरित्रातून दाखवून दिले .
कधीही न संपणारे भोजन:
तुकोबाराय शेवटी म्हणतात, हे भक्तीप्रेमाचे भोजन एवढे 'लाटे' (भव्य आणि अथांग) आहे की, या पंक्तीत आलेला कोणताही जीव कधीही 'रिता' (उपाशी किंवा रिकामा) राहत नाही. जो येतो तो तृप्त होऊनच जातो.
जेव्हा आपण मनातील स्वार्थ आणि अपेक्षा सोडून देवाला शरण जातो, तेव्हा देव आपला ऋणी बनतो. विठ्ठलाचे नाम मुखात असेल, तर आयुष्यात कधीही पराभव (हार) होत नाही आणि मन नेहमी आनंदाने भरलेले राहते.
!! रामकृष्णहरी!!
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.