Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 23 September 2026

।।श्रीतुकोबाराय चैतन्य।।

संतांच्या विचारांच्या भोजनाने माणसाचा आत्मा अमर होतो

जेविले ते संत मागें उष्टावळी ।
अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा ।
पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥
परें परतें मज न लागे सांगावें ।
हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥
दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत
जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथें कोणीं कांहीं न धरावी शंका ।
मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड ।
पुरविलें कोड नारायणें ॥५॥
_____________________
।।श्रीतुकोबाराय चैतन्य।।
_____________________
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या जन्मापूर्वी जे संत-महात्मे या जगात आले, त्यांनी भगवत् - प्राप्तीचे परमानंदरूपी 'भोजन' तृप्त होऊन केले आहे. आता त्यांनी जे मागे ठेवले आहे, त्या उष्ट्या पत्रावळी गोळा करून (झाडा करून) खाण्याची इच्छा माझी आहे.
उष्टे भोजन म्हणजे काय?
"आपण रोज जे जेवतो, ते अन्न फार तर काही तासांत पचून जातं. त्याची ताकद संपली की पुन्हा भूक लागते. म्हणजेच माणसाला रोज जेवावं लागतं! पण संतांची उष्टावळ अशी नाही. संतांची उष्टावळ म्हणजे त्यांनी मागे ठेवलेले त्यांचे 'अमर विचार' आहेत.
हे विचार असे आहेत, जे माणसाच्या स्मरणात एकदा रुजले की ते कधीच पचून संपत नाहीत, उलट ते माणसाच्या जीवनाचा उद्धार करतात. पोटाच्या अन्नाने फक्त शरीर जगतं, पण संतांच्या विचारांच्या भोजनाने माणसाचा आत्मा अमर होतो!"तर यापूर्वी संतांनी रचलेली ज्ञानेश्वरी, संत नामदेव रायांची अभंग रचना किंवा एकनाथी भागवत किंवा इतर संतांचे गाथा ही संतांची 'उत्तरे' आहेत, जी आम्ही विश्वासाने आणि आदराने गोळा केली आहेत.
संत तुकाराम महाराज म्हणतात की संतांचे हे ज्ञानरुपी 'उच्छिष्ट' गोळा केल्यावर माझे अंतःकरण इतके शुद्ध झाले की, मी कर्मकांडाच्या, विटाळाच्या आणि 'सोवळ्या-ओवळ्या' या संकुचित कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे.
अद्वैत स्थिती आणि भगवंताचा संकेत:
संत श्रीतुकाराम महाराज म्हणतात की, मला आता ब्रह्मज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी (परा वाचेच्या पलीकडचे ज्ञान) इतर कोणी सांगण्याची गरजच उरलेली नाही; कारण मला स्वतः 'नारायणाने' हे आत्मज्ञान शिकवले आहे.
पौराणिक संदर्भ: श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे 'अनन्यभक्तीचे' गुह्य ज्ञान सांगितले, त्याचाच हा अनुभव आहे.
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता विठ्ठलाशिवाय कोणत्याही 'दुसऱ्या' भावनेला किंवा द्वैताला स्पर्श करत नाही (आतळत नाही). जेव्हा भक्त असा अनन्य होतो, तेव्हा प्रत्यक्ष भगवंत त्याच्या रक्षणासाठी पाठीशी उभा राहतो.
भोजनाची आस आणि कोड कौतुक:
श्री संत तुकाराम महाराज सांगतात की, माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. मला केवळ एकाच गोष्टीची भूक (चाड) आहे, ती म्हणजे विठ्ठल प्राप्तीचे भोजन.
माझे मन या भक्तीच्या सुखाला इतके लाचावले आहे की, मी देवाला मिळवण्यासाठी झडप (झड) घातली आहे; आणि माझ्या या लाडक्या भक्ताचे सर्व हट्ट, सर्व 'कोड' माझ्या विठ्ठल - नारायणाने पूर्ण केले आहेत.
!! रामकृष्णहरी!!
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू.