Contact for Advertising
06 September 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 18 August 2026

देहूत पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा चा रास्ता रोको

देहू नगरपंचायत प्रशासनाने पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे ,अन्यथा येत्या सोमवारी (ता. 24 )पुलावर रास्ता रोको करण्याचा भाजपा युवा मोर्चा चा इशारा.

देहू : देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकात सुरू असलेल्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम येत्या रविवार (ता. 23) पर्यंत पूर्ण न झाल्यास व हा पूल वाहतुकीसाठी खुला न केल्यास देहू -देहूरोड भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने सोमवार (ता. 24) रोजी सायंकाळी पाच वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे, असे पत्र भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे यांनी देहू नगरपंचायती चे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना दिले आहे.
या पत्रावर सचिन मराठे आणि संभाजी टिळेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पालखी मार्गावरील देहू ते देहूरोड रस्त्यावर परंडवाल चौकात सुमारे साडे पाच कोटी रुपये खर्च करून नगरपंचायत प्रशासनाने पुलाचे रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. सध्या हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या चौकात दररोज वाहतूक कोंडी होते .नुकताच देहूतील एका युवकाचा या पुलावर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या पुलाचे काम त्वरित पूर्ण होऊन हा फुल वाहतुकीस खुला करावा ,असे निवेदन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने यापूर्वी देण्यात आले होते. मात्र अद्यापही प्रशासनाच्या वतीने या पुलाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने येत्या 24 तारखेला सायंकाळी पाच वाजता रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती अनिरुद्ध काळोखे यांनी दिली
याबाबत मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले, लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे . साधारणपणे दीड ते दोन महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल.