Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 16 October 2026

देहू रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या सुधारित बियाण्यांचे वाटप

पौष्टिक तृणधान्य प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन; प्रात्यक्षिक प्लॉटद्वारे उत्पादनवाढीचा प्रयत्न

देहू : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी ज्वारी पिकाच्या प्रात्यक्षिकाकरिता देहूतील शेतकरी यांना सुधारित बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी हवेली अमित रणवरे, मंडळ कृषी अधिकारी तुषार खंडागळे आणि उपकृषी अधिकारी सुचिता खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत बागायती क्षेत्रावर एक एकर क्षेत्रात ज्वारीचा प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात येणार आहे. यासाठी फुले यशोमती’ या सुधारित ज्वारीच्या जातीच्या बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतकरी सतीश काळोखे, रवी काळोखे व इतर उपस्थित होते.
ज्वारीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणे आवश्यक आहे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची आणि अझोटोबॅक्टर व पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकांची शिफारशीनुसार प्रक्रिया करून पेरणी करावी. या पद्धतींचा योग्य अवलंब केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होऊ शकते, तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत मिळते, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले .
शेतकऱ्यांनी सुधारित वाणांचा वापर, योग्य पेरणी वेळ आणि बीजप्रक्रिया यांना प्राधान्य देऊन ज्वारी पिकाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन देहू येथील सहाय्यक कृषी अधिकारी जयश्री पाडेकर यांनी शेतकरी बांधवांना केले.