पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यात ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये तसेच महिला व बाल विकास विभागांतर्गत निवासी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, शिबिरे व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये चित्रफितींचे प्रदर्शन, नाटिका, पथनाट्य, निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश आहे.
महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.
राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पुणे येथे सादर करावा, असे आवाहनही रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन
महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.