Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 14 October 2026

देहू संत जिजाबाई कन्या विद्यालयात महाभोंडला उत्साहात साजरा

विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भोंडल्याची गाणी गायली.

देहू : रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालयात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महाभोंडला उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीची आणि पारंपरिक लोककलेची ओळख करून देण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर ,पर्यवेक्षिका मनीषा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या महाभोंडला कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भोंडल्याची गाणी गायली. फेर धरून तालबद्ध पद्धतीने भोंडला खेळताना विद्यार्थिनींनी आनंदाने सहभाग घेतला. पारंपरिक लोकगीतांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागावी आणि आपल्या परंपरांची माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकवृंद व विद्यार्थिनींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.