Contact for Advertising
26 October 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 06 October 2026

देहू हवेली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संत जिजाबाई विद्यालयाचा दबदबा

१४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांचे विजेतेपद; दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

देहू : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या विद्यमाने आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांच्या सहकार्याने आयोजित हवेली तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत देहूतील संत जिजाबाई कन्या विद्यालयातील मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ व १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. या दोन्ही विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा देहू येथील संत तुकाराम महाराज क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू पूर्वा वाघ व राष्ट्रीय खो-खो खेळाडू आकाश टकले यांच्या हस्ते झाले.
यावेळी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, संत तुकाराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, पर्यवेक्षिका स्वालेहा पठाण यांच्यासह रयत संकुल, देहू येथील शिक्षकवृंद व फिनिक्स क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींचे तब्बल ५५ संघ, तर दुसऱ्या दिवशी मुलांचे ५६ संघ सहभागी झाले. स्पर्धेसाठी सुसज्ज क्रीडांगण तयार करण्यात आले होते. खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सहभागी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांसाठी फिनिक्स क्रीडा मंडळाच्या वतीने दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मुलींच्या गटातील अंतिम निकाल :
१४ वर्षांखालील गटात संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम क्रमांक मिळवला. भेकराई माता माध्यमिक विद्यालय, भेकराईनगर द्वितीय, तर हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय, फुलगाव तृतीय क्रमांकावर राहिले.
१७ वर्षांखालील गटातही संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी द्वितीय, तर कन्या प्रशाला, लोणी काळभोरने तृतीय क्रमांक मिळवला.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात जोगेश्वरी माता विद्यालय, वाडेबोह्वाई प्रथम, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, तर संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने तृतीय क्रमांक मिळवला.
मुलांच्या गटातील निकाल :
१४, १७ व १९ वर्षांखालील तिन्ही गटांत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल, लोणी काळभोरने प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील गटात नूतन माध्यमिक विद्यालय, वडकी द्वितीय, तर डॉक्टर अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय ठरले. १७ वर्षांखालील गटात इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोर द्वितीय व नूतन माध्यमिक विद्यालय, लोणी काळभोर तृतीय ठरले. १९ वर्षांखालील गटात नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगावने द्वितीय क्रमांक मिळवला.
संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विजेत्या संघांना क्रीडा मार्गदर्शक संदीप चव्हाण व सचिन दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.

स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मगर व सुनील घुमटकर यांनी केले, तर आभार सचिन दळवी यांनी मानले.