Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 23 September 2026

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये -शिवव्याख्याता अर्चना भोर

कर्मवीरांनी महाराष्ट्रात ज्ञानाचे नवे तीर्थ निर्माण केले – शिवव्याख्यात्या अर्चना भोर देहू येथे १३९ वा कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात संपन्न

देहू : उजाड माळरानाचे रूपांतर संपन्न ज्ञानमंदिरात करणारे कर्मवीर अण्णा हे एक ध्यासपर्व होते. “देव दगडात नाही, तर माणसात आहे. गरिबाचे लेकरू मोठे झाले पाहिजे, गरीबातील गरीब माणूस शिकला पाहिजे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये,” असा विचार शिवव्याख्यात्या अर्चना भोर यांनी व्यक्त केला.
संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे कनिष्ठ महाविद्यालय, संत जिजाबाई कन्या विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने १३९ वा कर्मवीर जयंती सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे, पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे, माझी पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, माजी विभागीय अधिकारी विठ्ठल निम्हण, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, विद्या कांबळे, पर्यवेक्षिका स्वालेहा पठाण, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माऊली काळोखे, रत्नमाला करंडे, वर्षा मोरे, विकास कंद, ॲड. सुनील काळोखे, प्रदीप काळोखे, राजेंद्र गाडे, राजेंद्र काटे, प्रीतम वारघडे, वनिता देशकर, माजी सरपंच सुनीता टिळेकर, भाग्यश्री शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड म्हणाले, “रयत शिक्षण संस्थेमुळे आपण घडलो. कर्मवीर अण्णांनी आपल्याला स्वाभिमान, कष्ट आणि चिकाटीची सूत्रे दिली. ही मूल्ये आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजेत.”
कार्यक्रमात विद्यालयातील विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांचा सन्मान करण्यात आला . तसेच गुणवंत कलाशिक्षक म्हणून रमेश खडबडे यांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रयत बँकेचे संचालक संदीप चव्हाण यांनी करून दिला. आभार विद्या कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन सुनील घुमटकर व मीनल साकोरे यांनी केले.