Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 20 October 2026

वाढदिवसाचा खर्च टाळून नितीन जाधव यांच्याकडून रुग्णाला उपचारांसाठी १० हजार १ रुपयांची मदत

वाढदिवसाचा खर्च टाळून गरजूंच्या मदतीला प्राधान्य देण्याचा नितीन प्रकाश जाधव यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

देहू : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू बालकाच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचा हात पुढे करत देहू येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन प्रकाश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महिंद्रा कंपनीतील सहकारी कामगार मित्र धीरज चर्जन यांचे चिरंजीव भाग्येश धीरज चर्जन यांच्या उपचारांसाठी १० हजार १ रुपयांची आर्थिक मदत केली.
भाग्येश याला गंभीर आजाराचे निदान झाले आहे. या आजाराचा त्याच्या यकृतावर परिणाम झाला असून, पुढील उपचारांसाठी यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) आवश्यकता आहे. या उपचारांसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबासमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत नितीन जाधव यांनी केलेली मदत महत्वाची ठरली आहे.
नितीन प्रकाश जाधव हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. गेल्या वर्षी त्यांनी चिखली येथील विकास अनाथ आश्रमात अन्नदान, शालेय साहित्य आणि पुस्तकांचे वाटप केले होते. तसेच मामुर्डी येथील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी उबदार जॅकेटचे वाटप केले. येलवाडी येथील आश्रमशाळेतही अन्नदान आणि फळवाटपाचा उपक्रम राबवण्यात आला होता.
वाढदिवस केवळ स्वतःच्या आनंदापुरता मर्यादित न ठेवता, त्या निमित्ताने गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करणे आणि संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हात देणे, हा नितीन जाधव यांच्या सामाजिक उपक्रमांमागील उद्देश आहे. भाग्येशच्या उपचारांसाठी त्यांनी केलेली आर्थिक मदत ही त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची आणि सहकारी मित्रांप्रती असलेल्या आपुलकीची प्रचिती देणारी आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून गरजूंच्या मदतीला प्राधान्य देण्याचा नितीन प्रकाश जाधव यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.