देहू : देहू शहरात मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर आठवडे बाजाराच्या दिवशी देहू शहरातून अवजड वाहने तसेच कंपनीतील कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसना प्रवेश देऊ नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मंगळवार आणि शुक्रवारच्या आठवडे बाजारासाठी देहू परिसरातील तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. तसेच देहू व परिसरातील हजारो नागरिक आणि महिला खरेदीसाठी बाजारात येतात. त्यामुळे बाजाराच्या दिवशी शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी होते.
देहूच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १४ टाळकरी कमानीपर्यंत वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. देहू-आळंदी रस्ता, देहू-देहूरोड रस्ता तसेच देहू-येलवाडी मार्गावर भाजीपाला विक्री होत असल्याने या मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढतो.
त्याचवेळी चाकण एमआयडीसी तसेच तळवडे सॉफ्टवेअर पार्ककडे जाणारी आणि येणारी मोठ्या संख्येने वाहने याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
देहू शहराबाहेरून जाण्यासाठी रिंग रोडचा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने मंगळवार आणि शुक्रवार या बाजाराच्या दिवशी देहू शहरातून अवजड वाहने तसेच कंपनीतील कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित प्रशासनाने बाजाराच्या दिवशी वाहतुकीचे नियोजन करून पर्यायी मार्गाने अवजड वाहने वळवावीत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
देहू आठवडे बाजाराच्या दिवशी अवजड वाहनांना देहूत प्रवेशबंदीची मागणी
वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित प्रशासनाने बाजाराच्या दिवशी वाहतुकीचे नियोजन करून पर्यायी मार्गाने अवजड वाहने वळवावीत