Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 16 September 2026

।। श्री तुकोबारायचैतन्य ।।

संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या इष्ट देवता श्री विठ्ठलाचे स्मरण वंदन केले आहे. हे अभंग वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या आरंभी गायले जातात.

अभंग क्रमांक 1
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
______________ ______
।। श्री तुकोबारायचैतन्य ।।
विवरण

२) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवोनिया।।

३) सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरीया।।

४) राजस सुकुमार मदनाचा पुतळा।रवीशशिकला लोपलिया।।

५) कर कटावरी तुळशीच्या माळा।ऐसे रूप डोळा दावी हरी।।

६)गरुडाचें वारीकें कासे पितांबर।सांवळे मनोहर कैं देखेन।।
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील सुरुवातीचे हे सहा अभंग मंगलचरणात्मक असून त्यामध्ये त्यांनी त्यांच्या इष्ट देवता श्री विठ्ठलाचे स्मरण वंदन केले आहे. हे अभंग वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या आरंभी गायले जातात.
ह्या व्यतिरिक्त तुकोबारायांनी त्यांच्या अभंग रचनेमध्ये श्री विठ्ठलाचे समचरणांवरती विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
तुका म्हणे समचि देणें। समचरणी उभा असे।।
तुका म्हणे जवळी आलें। उभे ठेंले समचरणी।।
तुका म्हणे समपाउलाचा खुंट। केला बळकट हलो नेदी।।किंवा
विटेवरी ज्याची पाऊलें समान। तोचि एक दानशूर दाता।।
अशा अनेक अभंगातून समचरणाचा महिमा गायला आहे .
तुकोबारायांची अवतार परंपरा पाहिल्यास त्यामधे त्यांच्या आराध्य देवतांची चरण रचना प्रत्येक अवतारात वेगवेगळी आहेत.जसे कृतयुगात भक्त प्रल्हाद अवतारामध्ये आराध्य देवता नरसिंह भगवंताचे चरण वज्रासारखे मजबूत आणि नखे युक्त होते. हिरण्यकशुपाचा वध करतेवेळी त्यांचा एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय हिरण्यकशुपला मारण्यासाठी त्याच्या छातीवर ठेवले.
त्रेता युगागामध्ये त्याचें आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्राबरोबर अंगद म्हणून वावरत असताना प्रभू श्रीरामचंद्र यांची पाऊले एक पाऊल पुढे व दुसरे पाऊल मागे होते .पुढे असलेले पाऊल हे संतांचे व भक्तांच्या रक्षणासाठी पुढे धावून जाण्याचे प्रतीक होते. तर दुसरे मागे असलेले पाऊल दृष्ट व राक्षसी प्रवृतीचा नाश करण्यासाठीचे होते. द्वापार युगामध्ये आराध्यदेव भगवान श्रीकृष्णा बरोबर त्यांचे परमभक्त उद्धव म्हणून तुकोबारायांचा जन्म झाला. आणि ह्या अवतारामध्ये श्रीकृष्णाचे चरण देहुडा चरण होते .श्रीकृष्ण उभे असताना एका पायाच्या पंजावर दुसऱ्या पायाचा तळवा किंवा नखे ठेवून त्रिभंग अवस्थेत उभे असायचे .कलियुगामध्ये प्रथमता संत नामदेव आणि नंतर संत तुकाराम महाराज यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल याचे चरण नामदेवरायांनी व संत तुकोबारायांनी समचरण म्हणूनच पाहिले आहे.
श्रीहरीचे चरण विटेवर सम आहेत. त्यांची दृष्टीही सम आहे आणि अशा साजर्‍या रूपावर वृत्ती स्थिर आहे. दर्शनला येणाऱ्या भक्ताप्रति आप-पर असा भेदभाव नसून प्रत्येकाकडे समान पहात आहे. व चरण ही सारखी आहेत विषम नाहीत.
दुसऱ्या चारणात तुकाराम महाराज म्हणतात ,मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी इच्छा आकांक्षा देखील राहू देऊ नका. ब्रह्मादिक पदे व या सारखे उच्च पदे ही भासमान होणारी आहेत. त्या ठिकाणी माझे मन जडू देऊ नको. कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शिखरेच असल्याने हे देवा जे जे काही कर्म धर्म आहे ,त्याचे वर्म आता आम्हांला समजले आहे. ती सर्वकाही नाशिवंत आहे. तुझे नाम,रूप,हेच खरे शास्वत सुख आहे ,अविनाशी आहे. म्हणून मोक्षपद तुच्छ करून फक्त तुझ्या चरणी आम्हाला अभय दे .सच्चिदानंद प्राप्त होउ दे!
।। रामकृष्णहरी।।
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष,
संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू.