पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन शाळांमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या संस्कारक्षम उपक्रमाचा शुभारंभ हरिनामाच्या जयघोषात उत्साहात करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी आणि शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक व सांस्कृतिक संस्कार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ वै. आबा रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा क्रमांक १०४, भूमकर चौक, वाकड; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बा. रा. घोलप माध्यमिक विद्यालय, नवी सांगवी तसेच नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शितोळेनगर, या शाळांत करण्यात आला.
नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेविका ताई वाकडकर, माजी नगरसेवक दादा भूमकर, ह.भ.प. बाळासाहेब महाराज खरमाळे, ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ, प्रा. सुरेखा गोंडाबे, प्रा. मयुरी लकारे, प्रा. अगले सर, प्रा. शरद ढोरे, संदेश नवले, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, दीपक काळे आणि ह.भ.प. प्रल्हाद महाराज भोईबार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आधुनिक काळात विद्यार्थ्यांना नैतिक संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमाचे महत्त्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विशद केले. संत साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची ओळख करून देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणे, यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मत प्रकाश काळे यांनी व्यक्त केले.
शाळांच्या व्यवस्थापन समित्या, संस्थांचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कारांची जोड देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
हरिनामाच्या जयघोषात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची ओळख होण्यास आणि त्यांच्या जीवनात नैतिक मूल्यांची रुजवण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडमधील तीन शाळांत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमाचा शुभारंभ
हरिनामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षणाची जोड