Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 17 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

मायेचा पसारा कितीही मोठा असला, तरी ईश्वराच्या चरणी लीन झाले की ती ब्रह्मामध्ये विरून जाते.

देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ६५
माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया ।
अंग आणि छाया जयापरी ॥१॥
तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपती ॥ध्रु.॥
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं ।
आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें ।
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥
___________________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।__________________________
वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे केवळ कोरडे ज्ञान नाही, तर तो प्रचितीचा आणि अनुभूतीचा मार्ग आहे. वेदांतातील अत्यंत अवघड समजला जाणारा 'अद्वैत सिद्धांत' (जीव आणि शिव एकच असणे) जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक भाषेत मांडला आहे.
माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया ।
अंग आणि छाया जयापरी ॥
आपल्या डोळ्यांना दिसणारी 'माया' (सृष्टी/जग) आणि तिचा मूळ आधार असणारे 'ब्रह्म' (परमात्मा) हे दोन वेगळे पदार्थ नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
'अंग आणि छाया'
शरीर असेल तरच सावली अस्तित्वात येते. शरीराशिवाय सावलीला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसते. सावली शरीरापासून वेगळी काढता येत नाही. तसेच या विश्वाचे आहे. हे जग म्हणजे परब्रह्माचीच सावली आहे. सोन्यापासून बनवलेले दागिने जसे सोन्यापेक्षा वेगळे नसतात, तसेच माया ब्रह्मापेक्षा वेगळी नाही.
तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपती ॥
आपण आपल्या सावलीला तलवारीने कितीही कापण्याचा प्रयत्न केला तरी ती 'तोडितां न तुटे' (तुटत नाही). तिला हाताने बाजूला ढकलले तरी ती 'सारितां निराळी' (बाजूला सरत नाही). माणसाने कितीही बौद्धिक कडेकोट केले, तरी मायेचा पाश सुटत नाही.
परंतु, जेव्हा तोच माणूस जमिनीवर माउलींच्या चरणी 'लोटांगण' घालतो, तेव्हा चमत्कार होतो. लोटांगण घातल्यावर ती सावली शरीराच्या खाली पूर्णपणे दडून जाते, नाहीशी होते. इथे 'लोटांगण' म्हणजे केवळ शारीरिक कृती नव्हे, तर तो 'अहंकाराचा संपूर्ण त्याग' आहे. जोपर्यंत साधक ईश्वराला संपूर्ण शरण जात नाही, तोपर्यंत ही माया संपत नाही. भगवद्गीतेतही भगवंतांनी हेच सांगितले आहे की, जे मला शरण येतात तेच माझी माया पार करू शकतात.
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं ।
आणिक ते आटी विचाराची ॥
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की, जर मूळ सत्य एकच आहे आणि तिथे दुसरे काही अस्तित्वातच नाही, तर मग तिथे 'बळ' (शक्ती) वापरण्याची काय गरज? जगात जेव्हा दोन भिन्न गोष्टी असतात, तेव्हा त्यांच्यात संघर्ष होतो. पण जिथे द्वैतच नाही, तिथे युद्ध कोणाशी करायचे?
मायेला जिंकण्यासाठी अनेक लोक हठयोग करतात, जंगलात जातात किंवा बुद्धीचा अट्टाहास ('आटी विचाराची') करतात. परंतु, तुकोबाराय या कोरड्या ज्ञानचर्चेला आणि हट्टाग्रहाणाला नकार देतात. अंधारात दोरीला साप समजून ती मारण्यासाठी काठी शोधणे जितके व्यर्थ आहे, तितकेच विश्वात ब्रह्म सोडून दुसरी माया शोधणे व्यर्थ आहे. केवळ ज्ञानाचा प्रकाश पडला की समजते, तिथे माया नव्हतीच, फक्त ब्रह्मच होते!
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें ।
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं।।
या चरणात तुकोबाराय व्यवहारातील एक सोपा नियम सांगतात. माणूस जितका ताठ आणि उंच उभा राहील, त्याची सावली (माया) तितकीच मोठी आणि लांब पडते. पण जो ठेंगणा होतो किंवा नम्रतेने लवतो (वाकतो), त्याची सावली आखूड होते आणि लोटांगण घातल्यावर तर ती नाहीशीच होते.
मी' पणाचा ताठ कणा जोपर्यंत उभा आहे, तोपर्यंत मायेचा फेरा मोठा राहणारच. पण जेव्हा साधक संत चरणी किंवा भगवंत चरणी लीन होतो, तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो.
जसा पुराच्या पाण्यात मोठा ताठ वृक्ष उन्मळून पडतो, पण लहान असणारे लव्हाळे (गवत) वाकून सुरक्षित राहते, तसेच संतांच्या चरणी लवल्याने संसाराचा महापूर साधकाला बाधू शकत नाही.
मायेचा पसारा कितीही मोठा असला, तरी ईश्वराच्या चरणी लीन झाले की ती ब्रह्मामध्ये विरून जाते.
!! रामकृष्णहरी !!

नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.