Contact for Advertising
26 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 24 October 2026

देहू नगरपंचायतीच्या वेबसाईटवर जुनेच पदाधिकारी; अपडेटअभावी नागरिकांमध्ये चर्चा

नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे यांच्या निवडीनंतरही वेबसाईटवर जुन्याच नावांचा उल्लेख

देहू : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीला दोन महिने उलटून गेले असतानाही नगरपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटवर अद्याप जुन्याच पदाधिकाऱ्यांची नावे दिसत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या वेबसाईट अद्ययावतीकरणाबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण, तर उपनगराध्यक्षपदी योगेश काळोखे यांची निवड झाली आहे. मात्र, नगरपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटवरील ‘रिप्रेझेंटेटिव्ह’ या सदरामध्ये अद्याप पूजा दिवटे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी, तर शिवशरण यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी दर्शविण्यात येत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होऊनही वेबसाईटवर जुन्याच नावांचा उल्लेख कायम असल्याने वेबसाईट अद्ययावत करण्याच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या जवळ असलेल्या देहू नगरपंचायतीच्या वेबसाईटवर पदाधिकाऱ्यांची माहिती तसेच विविध कामांचे तपशील वेळोवेळी अद्ययावत असणे अपेक्षित आहे. मात्र, वेबसाईटवर आवश्यक बदल आणि अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याने नगरपंचायतीची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा किती कार्यक्षमतेने काम करते, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची सत्ता असून, आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेचार वर्षांपूर्वी नगरपंचायतीत सत्ता स्थापन झाली. या कालावधीत विविध विकासकामे झाल्याचे सत्ताधारी सांगतात. मात्र, संबंधित विकासकामांची माहिती नगरपंचायतीच्या वेबसाईटवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यास नागरिकांना ती माहिती सहजपणे कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
याबाबत नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सोमवार, दि. २६ रोजी नगरपंचायत कार्यालयात गेल्यानंतर यासंदर्भात माहिती घेऊन लवकरच वेबसाईटवरील बदल करण्यात येतील, असे सांगितले.

उपनगराध्यक्ष योगेश काळोखे यांनीही वेबसाईट तपासून दोन दिवसांत आवश्यक अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे सांगितले. मध्यंतरी सॉफ्टवेअरची समस्या निर्माण झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे वेबसाईटवरील माहिती अद्ययावत करण्यासाठी नेमकी कोणती कार्यवाही करण्यात येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.