देहू: देहू नगरपंचायतच्या निवडणूक २०२१ ला पार पडली. देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर प्रथमच झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली.या नगरपंचायतमध्ये आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचाराच्या झंजावातामुळे सतरा पैकी १५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले.तर एक जागेवर भारतीय जनता पक्षाची महिला उमेदवार विजयी झाली.तर एकजण अपक्ष म्हणून निवडून आले.त्यानंतर या दोन्ही विजयी उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेची वाट धरली.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा नगरपंचायत सदस्य झाले.त्यामुळे नगरपंचायत मध्ये विरोधाला कोणी राहिले नाही.
येत्या डिसेंबर अखेर विद्यमान नगरपंचायत सदस्यांची पाच वर्षाची मुदत संपणार आहे. जानेवारी 2027 देहू नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.त्यातच नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला गटाला राखीव असल्याने इच्छुक महिला कार्यकर्त्यांची स्पर्धा वाढली आहे.अनेक पुरुष कार्यकर्ते आपापल्या पत्नीला पक्षाचे पदाधिकारी नेमून त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
देहू नगरपंचायत च्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही आपापले कार्यकर्ते सक्रिय केलेले आहे.याचाच एक भाग म्हणून भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.ग्रामविकासमंत्री जयराम गोरे यांना निमंत्रित करून पक्षाचे नवीन कार्यालय सुरु करण्यात आले आहे.माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही पुन्हा अधिक सक्रिय होवून संघटना वाढविण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे चित्र दिसत आहे.आगामी निवडणुकीत भाजपचे दहा पेक्षा जास्त सदस्य निवडून येतील ,असा दावाही आपल्या भाषणात बाळा भेगडे यांनी केला आहे.तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देहू नगरपंचायतमध्ये सत्तेत असताना राष्ट्रवादी काग्रेसकडून राहिलेल्या विकास कामांचा धागा पकडून नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरल्याचे चित्र दिसत आहे.नुकताच देहू देहूरोड या पालखी मार्गावरील पुलाचे रखडलेल्या रुंदीकरणाचे काम लवकर होण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.त्यात नगरपंचायत प्रशासनाने लवकरच काम पूर्ण करू, असे आश्वासन भाजपला दिले.येत्या काही दिवसात देहू ते देहूरोड या पालखी मार्गाचे रुंदीकरण देहू नगरपंचायतच्या हद्दीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे शिष्टमंडळ जाणार आहे.देहूचे वाढते नागरीकरण पाहता वीज,पाणी,रस्ते या समस्या निर्माण झालेल्या आहेत.वीज वितरणचा देहूत बोजवारा वाजला आहे.अनेक नागरिक त्रस्त आहे.काही जणांनी वीज वितरणचा व्हाट्सग्रुप तयार केलेला आहे.यात दररोज वीज वितरण कंपनीला आणि देहूचे लोकप्रतिनीधींना प्रश्न विचारून कायम स्वरुपी तोडगा काढण्याचे नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे.गावातील रस्त्यांची दुरवस्था असून रस्त्याच्याकडेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सुविधा नाही.त्यामुळे एन पालखी सोहळ्यात पावसाचे पाणी घरात आणि रस्त्यावर होते.नागरिकीकरणामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे.गावात आरो प्लॅन्ट ची संख्या जास्त असल्याने पिण्याची पाण्याची समस्या सुटलेली आहे.आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी होत आहे. विकास आऱाखड्यात देहू आळंदी रस्त्याचे रुंदीकरणासाठी बाधितांना मोबदला देवूनही रुंदीकरण रखडलेले आहे.त्यामुळे देहू आळंदी रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम खाते आणि देहू नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.दिवसे दिवस वाढत असलेले बकालीकरण हा मुद्दाही महत्वाचा आहे.या सर्वांचा धागा पकडून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपंचायत सदस्य नगरपंचायतमध्ये काम करत आहेत.प्रशासन त्यांच्या हातात आहे.मात्र जनतेची कामे का होत नाही,असे नागरिक विचारत आहे.साडेचार वर्षात देहू आळंदी रस्त्याचे रुंदीकरणाला सत्ताधाऱ्यांनी का प्राधान्य दिले नाही,असा सवाल नागरिक करत आहे.चिखलीतील अनेक लघु उद्योग मोठ्या प्रमाणात देहूत आले.त्यामुळे गावातील वीज समस्या वाढली.चाळीस चाळीस वर्षापूर्वीच्या विजेच्या तारा नागरीवस्तीत आजही खांबावर लोंबकळत आहेत.भूमिगत वीज कामे काही वार्डात झाली.गावात अनेक भागात सिमेंट रस्ते झाले.मात्र त्यांची गुणवत्ता तपासली तर अनेक ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे लागेल,अशी चर्चा नागरिकांत आहे.सांडपाणी प्रकल्प बंद अवस्थेत आहे.गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सांडपाणी रस्त्यावर येत आहे.विविध गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे.यावर काय तोडगा काढला, याचे उत्तर मिळणे कठीण आहे.
एकटे आमदार कोठे कोठे धावणार-----
आमदार सुनिल शेळके देहूत येणार म्हटल्यावर गावात कार्यकर्त्यांची फौज तयार होते.सगळे गोळा होतात.गावात वातावरण तयार होते. ही जमेची बाजू आहे.मात्र सत्तेत असताना केलेली आणि झालेली विकास कामे सतरा वार्डात प्रचार करून पोचवली जातात, का हा खरा प्रश्न आहे.कोट्यवधी रुपयांची कामे गेले साडेचार वर्षात झाली असेल पण त्याची चर्चा आणि प्रचार करण्याची जबाबदारी सध्याच्या विद्यमान नगरपंचायत सदस्यांवर आहे.तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नेते मंडळीवर आहे.केलेली विकास कामे जनतेपर्यत पोचविण्यास आपण कोठे कमी तर पडलो नाही ना याचे आत्मपरिक्षण नगरपंचायत सदस्यांनी करणे गरजेचे आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी सत्वपरीक्षा आहे.
काग्रेस,शिवसेना यांचीही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु आहे.देहू शहर काँग्रेसची दर आठवड्याला गावात बैठक होत असते.त्यात आगामी काळात निवडणूक चर्चा आणि पक्षाचा प्रचार करण्यासाठी संगठन सुरु आहे.राष्ट्रवादी काग्रेस (शरद पवार गट) जुने नेते मंडळी या सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे.तेही आगामी निवडणुकीत तयारीने उतरणार आहे.
देहू नगरपंचायतीमध्ये भाजप कम बॅकला तयार, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)ची सत्वपरिक्षा
डिसेंबर 2026 अखेर देहू नगरपंचायत विद्यमान सदस्यांची पाच वर्षाची मुदत पूर्ण होत आहे त्यामुळे आत्तापासूनच विविध पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून जय्यत तयारी सुरू आहे.