Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 04 October 2026

देहू इंद्रायणी घाटावर गोधडी धुण्याच्या बंदीला नागरिकांची केराची टोपली

संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठ स्थान परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. हात पाय धुवून आणि तीर्थ प्राशन करून देऊळवाडयात प्रवेश करतात. त्यामुळे देऊळवाडा परिसरात गोधडी धुण्याचे टाळावे

देहू : देहू नगरपंचायत हद्दीतील इंद्रायणी घाटावर गोधडी धुतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारे फलक देहू नगरपंचायत प्रशासनाने घाट परिसरात लावले आहेत. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करत रविवार(ता. ४) रोजी संत तुकाराम महाराज देऊळवाडा परिसरातील इंद्रायणी घाटावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गोधड्या व कपडे धुतले जात असल्याचे चित्र दिसून आले.
इंद्रायणी नदीच्या पात्रात गोधड्या व कपडे धुतल्यामुळे नदी प्रदूषित होत असल्याचे कारण देत नगरपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
“गावामध्ये दररोज नळाला पाणी येत नाही. अनेक वेळा तीन-तीन दिवस नळाला पाणी येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी गोधड्या आणि कपडे धुवायचे कुठे?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.
नवरात्र, दिवाळी, दसरा यांसारख्या सणांच्या काळात देहूतील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणी घाटावर गोधड्या धुतात. त्यामुळे अचानक अशा प्रकारचे फलक लावून नागरिकांवर कारवाईचा इशारा देण्याऐवजी नगरपंचायतीने प्रथम नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, गावातील सांडपाणी नदीपात्रात किंवा नदी परिसरात येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच १४ टाळकरी कमान परिसरात सांडपाणी येत असल्यास त्याचीही तपासणी करून नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
“गोधडी धुतल्याने किती प्रमाणात प्रदूषण होते, याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना द्यावी. नदी प्रदूषणाचा प्रश्न असेल तर केवळ गोधडी धुण्यावर कारवाई न करता नदीत येणाऱ्या सांडपाण्याचीही तपासणी करावी,” अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि नदी प्रदूषण या दोन्ही बाबींचा समतोल साधून नगरपंचायत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.