Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 26 September 2026

देहू डीजे च्या तालावर नाचत चार तासानंतर गणरायाला देहूकरांचा निरोप

फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आणि ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली

देहू, ता. 26 ः फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचत देहूतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शुक्रवारी(ता.25) गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. सुमारे चार तासांनंतर विसर्जन मिरवणूक संपली. डॅा.नानासाहेब धर्माधिकारी संस्थेने निर्माल्य जमा करण्याचे काम केले.मावळ आणि मुळशी परिसरातील सुमारे दोनशे कार्यकर्ते निर्माल्य जमा करत होते.
देहूतील इंद्रायणी नदी काठावर सकाळपासून विसर्जनासाठी गर्दी होती.घरगुती गणरायाचे विसर्जन दुपारी करण्यात आले.देहू नगरपंचायतच्या वतीने माळवाडी,विठ्ठलवाडी आणि नगरपंचायत कार्यालयासमोर हौद उभारण्यात आले होते.या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी गणेश मुर्तींचे विसर्जन केले.
रात्री आठ वाजता देहूच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली.सर्वच मंडळांनी डीजे वाजवत विसर्जन मिरवणुक काढली.आकर्षक विविध फुलांनी सजवलेले रथातील भव्य गणेशमुर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.देहूतील मानाचा नवशा गणपती मंडळाने यंदा विसर्जन मिरवणुकीसाठी भव्य फुलांनी सजविलेला कृष्णरथ केला होता.नवशा मंडळाच्या वतीने गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी केली.काळोखेमळा येथील जगद्गुरु मित्र मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी ढोलांची रथापुढे सलामी दिली. विठ्ठलवाडीचा राजा मित्र मंडळ,शिरिषकुमार मित्र मंडळ, माळीनगरचा यंगस्ट्रार मित्र मंडळ,महालक्ष्मी मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्वच मंडळांनी डीजेचा वापर केला होता.संगिताच्या तालावर मंडळाचे कार्यकर्ते बेभान होवून नाच करत होते.रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी विसर्जन मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती.चार तास मिरवणूक सुरु होती.
तत्पुर्वी सकाळपासून इंद्रायणीनदीच्या काठावर गणेश विसर्जनासाठी गर्दी होती.घरगुती गणपतीचे विसर्जनासाठी घरातील आबालवृद्ध,महिला उपस्थित होत्या.
डॅा.नानासाहेब धर्माधिकारी, देहू नगरपंचायतच्या वतीने निर्माल्य जमा करण्यात आले. देहूरोड पोलिस ठाणे यांच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकटः
देहूत डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचे पोलिसांची आवाहन केले होते.तसेच धन्वीची मर्यादा पाळण्याचे आदेशही देहूरोड पोलिसांकडून मंडळांना देण्यात आले होते.मात्र विसर्जन मिरणुकीत चित्र वेगळे पहावयास मिळाले.