Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 07 October 2026

देहू कंद पाटील नगर–बायपास रस्ता कधी होणार?

प्रलंबित रस्त्याच्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; मात्र सत्ताधाऱ्यांकडून लवकरच रस्ता पूर्ण होण्याचे आश्वासन

देहू : कंद पाटील नगर ते बायपास रोड या प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या प्रश्नावर भीमाशंकर मंदिर येथे नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत रस्त्याच्या कामाबाबत वारंवार आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
केवळ आश्वासनांनी प्रश्न सुटणार नाही:
बैठकीदरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे यांनी नागरिकांची बाजू ठामपणे मांडली. रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आता ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
काळोखे म्हणाले, “स्थानिक पातळीवर फक्त आश्वासने मिळत आहेत; प्रत्यक्षात काम होत नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी नागरिकांना शब्द देतो की, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाठपुरावा करू. नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही.”
“रस्ता होईपर्यंत सत्कार नको”:
रस्त्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींचा सत्कार करू नये, अशी भूमिका काळोखे यांनी यावेळी मांडली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रत्यक्ष काम झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काळोखे यांच्या भूमिकेचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले. या रस्त्याच्या प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे भेट घेऊन पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याबाबत देहू नगरपंचायतीचे रचनाकार विभागाचे प्रमुख सुरेंद्र आंधळे यांनी सांगितले, सदरचा रस्त्याचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता होऊ शकलेला नाही . मात्र हा शीव रस्ता असल्याने पंधरा ते वीस फुटापर्यंत रस्ता होऊ शकतो. यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक योगेश काळोखे यांनी सांगितले , आमदार सुनील शेळके आणि माझ्या प्रयत्नातून तीन ते चार वर्षापासून रस्त्याच्या कामासंदर्भात कार्यवाही सुरू आहे .या रस्त्याचे अलाइनमेंट बदलले तर हा रस्ता वेगवेगळ्या सोसायटीच्या फायद्यासाठी होईल. अन्यथा रस्ता बनवला तर याचा उपयोग होणार नाही. येत्या दोन दिवसात मोजणी होईल त्यानंतर पंधरा दिवसात मार्किंग होईल .
नगराध्यक्षा स्मिता चव्हाण म्हणाल्या , हा रस्ता डी पी आर मध्ये घेण्यात येईल. हा रस्ता होणे आवश्यक आहे. तसेच बाधित मालक शेतकऱ्यांना टीडी आर च्या स्वरूपात मोबदला देण्यात येईल.