देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहू कमान ते केंद्रीय आयुध भंडार (सी.ओ.डी.) डेपो प्रवेशद्वार तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गादरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, कामगार, लष्करी जवान तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संपूर्ण मार्गाचे तातडीने आणि दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी सी.ओ.डी. वर्कर्स कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा नसून, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुख्य पालखी मार्गाचा भाग आहे. दररोज या रस्त्यावरून सी.ओ.डी. परिसरातील संरक्षण कामगार, लष्करी जवान, शाळकरी विद्यार्थी आणि हजारो नागरिकांची ये-जा असते.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी न करता संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण करून दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
गतिरोधकांवर पांढरे पट्टे व सूचना फलकांची गरज:
या मार्गावर विविध ठिकाणी 28 गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने तसेच आवश्यक सूचना व चेतावणी फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते स्पष्टपणे दिसत नाहीत. विशेषतः पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो.
प्रशासनाने सर्व गतिरोधकांची तांत्रिक तपासणी करून त्यावर थर्मोप्लास्टिक पांढरे पट्टे मारावेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ‘पुढे गतिरोधक’, ‘अपघातप्रवण क्षेत्र’ यांसारखे मार्गदर्शक फलक लावावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
हद्दीचा प्रश्न बाजूला ठेवून समन्वयाने काम करा:
देहू कमान, सी.ओ.डी. डेपो परिसर ते कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत हद्द व मालकीचा प्रश्न उपस्थित होऊ नये. लष्कर प्रशासन, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे, अशी मागणी सी.ओ.डी. वर्कर्स कमिटीने केली आहे.
“हा मार्ग संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुख्य मार्ग असून येथे रात्रंदिवस लष्करी जवान आणि शेकडो कामगार ये-जा करतात. देहू कमान ते सी.ओ.डी. डेपोपर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. प्रशासनाने दिरंगाई न करता रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे, खड्डे व्यवस्थित बुजवावेत तसेच सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे आणि आवश्यक माहिती फलक लावावेत,” अशी मागणी सी.ओ.डी. वर्क्स कमिटीचे सेक्रेटरी संजय जगदीश डुमडे यांनी केली.
देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील देहू ते देहूरोड या साडेचार किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रचंड वाहतूक अडथळ्याला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे .रस्ता अरुंद असल्याने दहा मिनिटाच्या प्रवासासाठी एक तास येथील नागरिक, एमआयडीसीतील कामगारांना प्रवास करावा लागतो. साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी लष्कराची एनओसी मिळत नसल्याने हा रुंदीकरणाचा प्रश्न उद्भवला आहे. संत तुकाराम महाराज संस्थानने वारंवार संरक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे .भविष्यात या रस्त्यासाठी वारकरी संप्रदायाकडून देहू ते देहूरोड पर्यंत मोर्चा काढण्याचे नियोजन वारकऱ्यांच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
देहू कमान ते सी.ओ.डी. डेपो रस्त्याची प्रचंड दुरवस्था
तात्काळ डांबरीकरणाची सी.ओ.डी. वर्कर्स कमिटीची मागणी . स्थानिक नागरिक, भाविक, लष्करी जवान व कामगारांच्या जीविताचा प्रश्न