Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 19 September 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।

योग्यवेळी संसाराच्या मोहातून मुक्त होऊन श्रीहरीच्या भजनात जागरणामध्ये आपण गेलो पाहिजे.

अभंग ३३
सावध झालों सावध झालों ।
हरीच्या आलों जागरणा ॥१
जेथें वैष्णवांचे भार ।
जयजयकार गर्जतसे ॥२॥
पळोनियां गेली झोप ।
होतें पाप आड तें ॥३॥
तुका म्हणे तया ठाया ।
वोल छाया कृपेची ॥४॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
_______________________
संत श्रीतुकाराम महाराज यांचा उपदेशपर अभंग आध्यात्मिक संदेश आणि आत्मजागृती सांगतो . हा अभंग केवळ देवाच्या प्राप्तीसाठी मर्यादित नसून, मानवी जीवनाला अज्ञानारुपी अंधकारातून प्रकाशरुपी ज्ञानाकडे नेणारा एक महान आध्यात्मिक संदेश कलियुगात भगवंत प्राप्तीसाठी अत्यंत मार्गदर्शक असा आहे.
प्रत्येक युगामध्ये मनुष्याच्या आयुष्याचा, बुद्धीचा आणि शारीरिक क्षमतेचा थर बदलत गेला आहे. कृत युगामध्ये मनुष्याचे आयुष्य एक लाख वर्ष होते. त्रेतायुगामध्ये त्यातील एक शून्य कमी होऊन ते १०००० दहा हजार वर्षाचे झाले.
द्वापारयुगामध्ये पुन्हा एक शून्य कमी होऊन ते १००० (एक हजार वर्षाची झाले. आणि या प्रत्येक युगात परमेश्वर प्राप्तीसाठीची साधने वेगवेगळी होती. (शेकडो,हजारो वर्षे गुहेत तपस्या करणे, शरीराला वेगवेगळ्या प्रकारची कष्टदेऊन उपाशी राहून अघोरी तपस्या करावी लागत असे.)
कलियुगामध्ये आयुष्यात तील एक शून्य कमी होऊन मनुष्याचे आयुष्य सरासरी १०० ,शंभर वर्षे एवढे गणले गेलें आहे.
कलियुगात १०० वर्ष सरासरी आयुष्य मानले असले तरी मिळालेल्या आयुष्यात परमेश्वर प्राप्ती साठी अत्यंत साधे सोपे सोपे उपाय संतांनी सांगितले आहेत.
धरीं धरीं आठवण।
मानी संतांचे वचन।।
उदा: श्रवणभक्ती:-(भगवंताच्या कथा, कीर्तन कींवा धर्मोपदेश ऐकण),
किर्तन भक्ती :-भगवंताच्या गुण, लीला आणि नाम यांचे गायन करणे.
स्मरणभक्ती :- सर्व काळ देवाचे नाव,रुप आणि कृपा आठवत राहणे. इ. नवविधी भक्तीचें प्रकार आचरणात ठेवावे.
संत तुकाराम महाराज कलियुगातील आयुष्याची मोजणी करताना संगतात
गेलें रात्रीने ते अर्धे।
बाळपण जराव्याधें।।
१०० वर्षे आयुष्य गृहीत धरून त्यातील निम्मे म्हणजेच ५० वर्षाचे आयुष्य हे रात्रीच्या निद्रेत जाते, उरलेले आयुष्य बालपण, तारुण्य, आणि म्हातारपण वार्धक्य यामध्ये जाते आणि मग आध्यात्मिक जागृती मनुष्य देहाची सार्थकता यासाठी किती काळ शिल्लक राहतो?
आणि संसार सिंधुतून तरुन जाण्यासाठी पर्याय काय ते संगतायेत...
संत संघ धरा।
तुम्ही हरिभजन करा।।
ह्याच करता जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सावध करत आहेत.
योग्यवेळी संसाराच्या मोहातून मुक्त होऊन श्रीहरीच्या भजनात जागरणामध्ये आपण गेलो पाहिजे.
भोगइच्छारहीत झाले पाहिजे संत तुकाराम महाराज मनुष्य मात्राला जागरूक सावध करून श्री हरीच्या भजनात जाण्यासाठी वारंवार प्रेरित करत आहेत. ज्या ठिकाणी वैष्णवांचा मोठा समुदाय एकत्रितपणे सामूहिक भजन गात कीर्तन करीत आहेत आणि हरी नामाचा जयजयकार करत आहेत. त्याठिकाणी कीर्तन नाम्समरणामुळे मनातील अज्ञान आणि पापरूपी झोप जी भगवंताच्या प्राप्तीसाठी अडथळा ठरत होती ती झोप नष्ट झाल्यामुळे अत्ता प्रत्यक्ष ईश्वराची शीतल छाया मिळत आहे.
हरिनामामृत सेवी सावकाश।
मोक्ष त्याचा घोष दृष्टीपुढे।।
(श्री संत एकनाथ महाराज)
अमृतापेक्षा गोड असणारे आणि पाण्यापेक्षा शीतल असणारे हरिनामामृत रस , डोळे उघडे ठेवून हळूहळू सेवेन करता येते.
तुका म्हणे तया ठाया।
वोल छाया कृपेची।।
ईश्वराच्या या कृपेमुळेच भक्तांना भक्तिरसाचे सेवन आणि मनाला शीतलता प्राप्त होते.
।। रामकृष्णहरी ।।
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान
श्रीक्षेत्र देहू.