Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 18 September 2026

।।श्री तुकोबाराय चैतन्य।।

देव शब्दांचा भुकेला नसून प्रेमाच्या भावांचा भुकेला आहे. मौन आणि अश्रू हे शब्दांपेक्षा तीव्र भावना प्रकट करतात. देवाने गोड स्वर दिला नसला, तरी गीत गाता येत नसले तरी तू त्यांचे नामस्मरण करीत रहा.

अभंग क्रमांक: ३२
नये जरी तुज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥
देवापाशीं मागें आवडीचीभक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥
तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
_______________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
_______________________
संत तुकाराम महाराज या अभंगात परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी शब्दाद्वारे मनातील भावना प्रभावीपणे प्रगट करता नाही आल्या तरी किंवा अतिशय गोड मधुर आणि ऐकायला आनंद देणारे स्वर गाता नाही आले, तरी देवाला प्रसन्न करण्यासाठी मनात फक्त निर्मळ भाव, विश्वास आणि अढळ श्रद्धा हवी असते.
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,
मन बुद्धी काया वाचा शुद्ध करीं। तुका म्हणे वाचा वाहिली अनंता।।
त्रेतायुगात शबरीची बोरे:-
शबरीकडे ना सुंदर शब्द होते ना ज्ञान. तिने फक्त प्रभू श्रीरामचंद्र यांच्या आगमनाची अपार श्रद्धा ठेवून आयुष्यभर विश्वासाने प्रतीक्षा केली. ते आल्या नंतर त्यांना प्रेमाने मधुर असणारी उष्ठीबोरे खाण्यासाठी दिली .आणि प्रभू श्रीरामांनी ती प्रेमाने सेवन केली.
द्वापारयुगामध्ये पेंद्या :-भगवान श्रीकृष्णाचा बालपणीचा अत्यंत जिवलग मित्र. बोलताना तो अडखळत असला तरी त्याचे श्रीकृष्णावर अथांग प्रेम होते. श्रीकृष्ण त्याच्या बोबड्या बोलाचे कौतुक करायचे. पेंद्यास ल,र,श असा शब्दउच्चार करता येत नसायचा .तो श्रीकृष्णाला कृष्णाच्या ऐवजी तुला,तुला असे म्हणायचा. तरी श्रीकृष्ण त्याच्या मागे धावत जायचे, शिदोरी खाताना सवगड्यांना दही-भात दे मला ! असा बोबडे बोल बोलायचा .तरी भगवान श्रीकृष्ण त्याच्या मुखात स्वःहस्ते दही-भात भरवत असत.
भाव भक्तीविण काही न कळे।
म्हणजेच परमेश्वरा जवळ भाव महत्वाचा आहे. त्याला फक्त निर्मळ भाव आणि अढळभक्ती हवी असते.
फिरविले देऊळ जगामाझी ख्याती।
नामदेवा हाती दूध प्याला।।
संत नामदेवांनी बालपणी देवाला विश्वासाने आपल्या हातून दूध पाजले.
मधूरा उत्तरासवें नाही चाड।
अंतरंगी वाड प्रेम असो।।
देव शब्दांचा भुकेला नसून प्रेमाच्या भावांचा भुकेला आहे. मौन आणि अश्रू हे शब्दांपेक्षा तीव्र भावना प्रकट करतात.
देवाने गोड स्वर दिला नसला, तरी गीत गाता येत नसले तरी तू त्यांचे नामस्मरण करीत रहा.
तैसे विठ्ठलराया तुज मज आहे।
आवडींने गाय नाम तुझें।
वेडे वाकडे ते बाळकाचे बोल।
करिती नवल मायबाप।।
विठ्ठल गोड बोलण्या वाचून भूकेला नाही. जसा जमेल तसा “राम कृष्ण” "राम कृष्ण "हा मंत्र जप .श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची करुणा सतत अंतकरणाने भक्तिपूर्ण विश्वास धरून आर्ततेने करावी, असे तुकाराम महाराज म्हणतात .हे मना तुला मी परत परत सांगतो ते तू ऐक की हरी विषयी तू दृढ निर्धार पक्का कर.
।।रामकृष्णहरी।।
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू.