Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 07 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

खऱ्या परमार्थाची सुरुवात मनाच्या शुद्धतेतून होते. जोपर्यंत अंतःकरणातील कपट आणि अहंकार जात नाही, तोपर्यंत तीर्थयात्रा करूनही काही लाभ होत नाही

देहू :
सकळ चिंतामणी शरीर ।जरी जाय अहंकार समूळ आशा ।
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि ।निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी ।येती तयापासीं अवघीं जनें ।
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक ।मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा ।मंडित सकळा भूषणांसी।
हरिच्या गुणें गर्जताति सदा ।आनंद तया मानसीं ॥३॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा ।आशा नाहीं कवणाची।
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा ।काय महिमा वर्णूं त्याची ॥४॥
_____________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
_____________________
जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज या अभंगात अहंकाराचा नाश झालेल्या एका आदर्श संताचे आणि त्यांच्या शुद्ध अंतःकरणाचे वर्णन करत आहेत. जेव्हा माणसाच्या मनातील विकार नष्ट होतात, तेव्हा त्याचे सामान्य शरीरच देवरूप कसे बनते, हे महाराजांनी अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहे.
स्फटिकासारखे निर्मळ शरीर:
सकळ चिंतामणी शरीर ।
जरी जाय अहंकार समूळ आशा ।
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि ।
निर्मळ स्फटिक जैसा ॥
ज्याच्या मनातील अहंकार, विषयवासना आणि सर्व आशा समूळ (मुळासकट) नष्ट झाल्या आहेत; ज्याच्या मनात कुणाबद्दलही निंदा, हिंसा, कपट आणि देहबुद्धी उरलेली नाही, त्याचे अंतःकरण स्फटिक मण्यासारखे अत्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि निर्मळ होते. अशा पवित्र पुरुषाचे शरीर हे केवळ हाडामासाचे राहत नाही, तर ते 'चिंतामणी' सारखे बनते. चिंतामणी जशी सर्व इच्छा पूर्ण करतो, तसे संतांच्या केवळ सान्निध्याने भक्तांच्या सर्व चिंता दूर होतात.
संतांचे दर्शन हाच मोक्ष:
"मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी ।
येती तयापासीं अवघीं जनें ॥"
ञपुण्य मिळवण्यासाठी किंवा मोक्षासाठी लोकांना काशी किंवा वाराणसीला जाण्याची गरज उरत नाही. कारण असा संत स्वतःच 'तीर्थांचे तीर्थ' (महातीर्थ) बनलेला असतो. त्यामुळे सर्व लोक स्वतःहून त्यांच्या दर्शनासाठी धावत येतात. अशा संत पुरुषाचे केवळ डोळे भरून दर्शन घेणे, हाच भक्तांसाठी मोक्ष ठरतो.
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक ।मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
गंगा नदी जशी स्वतः पवित्र असल्याने लोकांची पापे धुण्यासाठी कुठे जात नाही, तर लोक स्वतःहून गंगेकडे येतात; अगदी त्याचप्रमाणे संतांचे अंतःकरण एवढे पवित्र असते की, जगातील आर्त आणि मुमुक्षू जीव स्वतःहून संतांच्या चरणापाशी धाव घेतात.
बाह्य अवडंबराची गरज नाही :
"मन शुद्ध तया काय करिसी माळा ।
मंडित सकळा भूषणांसी ॥"
तुकोबाराय म्हणतात की, ज्याचे मन आतून संपूर्ण शुद्ध झाले आहे, त्याला वरून गळ्यात मोठ्या माळा घालण्याची किंवा बाह्य आचारांची मुळीच गरज नाही. त्याचे शुद्ध मन हेच त्याचे सर्वात मोठे भूषण (दागिना) आहे. त्यांच्या मनात अखंड हरीच्या नामाचा गजर सुरू असतो, त्यामुळे त्यांच्या चित्तात सदैव परमानंद दाटलेला असतो.
"चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती ।
व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥"
ज्याचे चित्त शुद्ध आहे, त्याला संपूर्ण जग आपलेच वाटते जगात त्याचे कोणी शत्रु राहत नाही उलट शत्रुच मित्र बनतात. .
"मन निर्मल भया जइसे गंगा नीर । पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर ॥"
संत कबीरदासजी सुद्धा हेच म्हणतात की मन गंगेसारखे निर्मळ झाले की देव स्वतः त्या भक्ताच्या पाठीमागे पाठीराखा म्हणून त्याला हाका मरतो.
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा ।
काय महिमा वर्णूं त्याची ॥
तुकाराम महाराज म्हणतात , असा संत पुरुष 'परिसापेक्षाही आगळा' (श्रेष्ठ) आहे. परिस लोखंडाचे सोने करतो, पण लोखंडाला परिस बनवू शकत नाही. मात्र, संत स्वतःसारखेच दुसऱ्यालाही संत बनवतात! अशा संतांचा महिमा गाताना माझे शब्दही अपुरे पडतात, असे तुकाराम महाराज म्हणतात.
खरा परमार्थ:-
खऱ्या परमार्थाची सुरुवात मनाच्या शुद्धतेतून होते. जोपर्यंत अंतःकरणातील कपट आणि अहंकार जात नाही, तोपर्यंत तीर्थयात्रा करूनही काही लाभ होत नाही. मन स्फटिकासारखे स्वच्छ ठेवणे हीच खरी साधना आहे.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू.