देहू :
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥
_____________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
_____________________
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगात संतांच्या संगतीचे आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचे महात्म्य सांगत आहेत. परमार्थात चार प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. या सर्व मुक्तींमध्ये 'सायुज्यता मुक्ती' ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते, जिथे भक्त आणि देव यांच्यात अजिबात भेद उरत नाही. तुकोबाराय म्हणतात की, अशी ही कठीण मुक्ती संतांच्या केवळ एका भेटीने सहज साध्य होते.
"आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥"आणि
"ऐसा संताचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥"
खऱ्या संतांचे केवळ दर्शनच नाही, तर त्यांचे 'आलिंगन' (प्रेमाने मारलेली मिठी ) साधकाला थेट सायुज्यता मुक्ती देऊन जाते. संतांच्या हृदयामध्ये साक्षात परब्रह्म विठ्ठल वास करत असतो, त्यामुळे जेव्हा संत भक्ताला हृदयाशी धरतात, तेव्हा भक्ताचा जीव शिवाशी एकरूप होतो. महाराजांच्या मते, संतांचा हा महिमा इतका अगाध आहे की त्याचे वर्णन करताना शब्दांची मर्यादा संपते, म्हणजेच 'बोलायाची सीमा' होते. संतांचे मोठेपण सांगायला शब्द अपुरे पडतात.
"तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥"
सामान्य माणूस पापांचे क्षालन करण्यासाठी आणि पुण्यासाठी गंगा, गोदावरी किंवा काशी, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्री जातो किंवा सिंहस्थ, आषाढी-कार्तिकी सारख्या 'पर्वकाळाची' (पवित्र वेळेची) वाट पाहतो. परंतु तुकोबाराय सांगतात की, जगात जेवढी काही पवित्र तीर्थे आणि पुण्यकारक पर्वकाळ आहेत, ते सर्व संतांच्या 'पायांपें' म्हणजे चरणाशीच लोळण घेत असतात. संतांचे चरणस्पर्श करणे म्हणजेच सर्व तीर्थांचे स्नान केल्यासारखे आहे.
ज्याप्रमाणे जगातील सर्व लहान-मोठ्या नद्या स्वतः पवित्र होण्यासाठी शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे जगातील सर्व तीर्थे स्वतःचे पावित्र्य टिकवण्यासाठी संतांच्या चरणांचे दर्शन घेतात. संत हे तीर्थांनाही पावन करणारे 'तीर्थराज'आहेत
"तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥"
हे देवा, संतांची सेवा करणे म्हणजेच तुझी थेट सेवा करण्यासारखे आहे. देवाला शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही; संतांच्या रूपात देव या भूमीवर प्रत्यक्ष वावरत असतो. म्हणून जो संतांची मनोभावे सेवा करतो, त्याची सेवा थेट नारायणापर्यंत पोहोचते आणि देव त्याच्यावर प्रसन्न होतो.
संतांचा संग हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. संतांच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करल्यास मानवाला इतर कोणत्याही अवघड साधनेची गरज उरत नाही, कारण संतांच्या प्रेमातच देव आणि मोक्ष दोन्ही सामावलेले आहेत.
।। रामकृष्णहरी ।!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू.
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
संतांचा संग हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. संतांच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करल्यास मानवाला इतर कोणत्याही अवघड साधनेची गरज उरत नाही,