Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 12 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

जोपर्यंत आपण वस्तूंच्या आणि संपत्तीच्या मागे धावतो, तोपर्यंत आपण चिंतेचे गुलाम असतो.

देहू :
आम्ही सदैव सुडके ।
जवळीं येतां चोर धाके ।
जाऊं पुडी भिकें ।
कुतरीं घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसे सांगा ।
नाहीं तरी वांयां भागा ।
थोरपण अंगा ।
तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥
अक्षई साचार ।
केलें सायासांनी घर ।
एरंडासी हार ।
दुजा भार न साहती ॥३॥
धन कण घरोघरीं ।
पोट भरे भिकेवरी ।
जतन तीं करी ।
कोण गुरें वासरें ॥४॥
झाली सकळ निश्चिंती ।
भांडवल शेण माती ।
झळझळीत भिंती ।
वृंदावनें तुळसीचीं ॥५॥
तुका म्हणे देवा ।
अवघा निरविला हेवा ।
कुटुंबाची सेवा ।
तोचि करी आमुच्या ॥६॥
______________________
।।श्री तुकोबराय चैतन्य।।
______________________
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण गाथेतील हा एक अत्यंत विलक्षण आणि क्रांतिकारी अभंग आहे. जन्माने देहू गावातील अत्यंत श्रीमंत, सावकार आणि प्रतिष्ठित मोरे घराण्यातील असूनही, तुकोबारायांनी विठ्ठलभक्तीसाठी स्वतःहून 'फकिरी' आणि 'परम वैराग्य' का पत्करले, याचा जिवंत इतिहास या अभंगात दडलेला आहे. प्रपंचात धन-दौलत असूनही चिंतेने जळणाऱ्या जगाला महाराजांनी स्वतःच्या अकिंचन (संपत्तीहीन) पण आनंदी जिण्याचा आरसा येथे दाखवला आहे.
अकिंचन अवस्था आणि चोरांचे भय नाही:
आम्ही सदैव सुडके ।
जवळीं येतां चोर धाके ।
जाऊं पुडी भिकें ।
कुतरीं घर राखती ॥
अभंगाच्या सुरुवातीलाच तुकोबाराय म्हणतात की, आम्ही प्रपंचाचा त्याग करून आता नेहमी 'सुडके' म्हणजे फाटके किंवा साधे वस्त्र नेसणारे दरिद्री झालो आहोत. ज्या माझ्या घराच्या दारात कधी संपत्तीचा पूर होता, तिथे आज माझ्या मनात विठ्ठलाशिवाय कशाचीही वासना उरलेली नाही. आमच्या घरात चोरांना चोरण्यासारखे काहीच नसल्याने आमच्या जवळ यायला 'चोरच धाकतात' (भितात). जेव्हा आम्ही वैराग्य टिकवण्यासाठी अंगी नम्रता टिकून राहान्यासाठी बाहेर भिक्षेला (मधुकरीसाठी) जातो, तेव्हा आमच्या मोकळ्या घराचे रक्षण केवळ बाहेरची कुत्रीच करतात, कारण तिथे कडी-कुलूपाची कोणतीही गरजच उरत नाही!
खऱ्या थोरपणाचे लक्षण आणि जगाची फजिती:
"नांदणूक ऐसे सांगा ।
नाहीं तरी वांयां भागा ॥"
"थोरपण अंगा ।
तरी ऐसें आणावें ॥"
तुकाराम महाराज येथे श्रीमंतीच्या आणि खोट्या थोरपणाच्या मागे लागून रात्रं-दिवस चिंतेत विनाकारण दमणाऱ्या (वांयां भागा) प्रपंचिक लोकांचे उदाहरण देत आहेत.
महाराज जगाला आव्हान देऊन विचारतात की, आमच्यासारखी सुखाची, समाधानाची आणि विठ्ठल चरणावरील ही श्रीमंती (नांदणूक) कोणाकडे आहे का ते सांगा?
जर नसेल तर तुम्ही चुकता आहात. माणसाला जर जीवनात खरे थोरपण आणि परम शांती हवी असेल, तर त्याने सर्व व्यावहारिक वासनांचा त्याग करून आमच्यासारखे निश्चिंत व्हावे.
एरंडाचे घर आणि भिके'चे परम रहस्य:
"अक्षई साचार ।
केलें सायासांनी घर...
"धन कण घरोघरीं ।
पोट भरे भिकेवरी..."
महाराज म्हणतात की, आम्ही मोठ्या कष्टाने आमचे विठ्ठलभक्तीचे 'अक्षई' (कधीही नष्ट न होणारे) घर उभे केले आहे. त्या झोपडीला खांब म्हणून आम्ही हलक्या 'एरंडाची' लाकडे वापरली आहेत, कारण या गरिबाच्या घराला व्यावहारिक वैभवाच्या जड लाकडाचा भार सहनच झाला नसता!
भिक्षा की मधुकरी?
स्वतः तुकोबाराय दुसऱ्या एका अभंगात म्हणतात,
"भिक्षा पात्र अवलंबणें ।
जळो जिणें लाजिरवाणें ॥"
तिथे ते अशा ढोंगी आणि आळशी लोकांचा निषेध करतात जे स्वतः कष्ट न करता केवळ पोट भरण्यासाठी आणि संपत्ती गोळा करण्यासाठी देवाच्या नावाचा वापर करून जगासमोर लाचार होतात.
पण, तुकोबाराय या अभंगातून
"जाऊं पुडी भिकें" किंवा "पोट भरे भिकेवरी"असे म्हणतात, तेव्हा तो जगासमोर हात पसरण्याचा लाचार भाव नाही. हा अहंकार पूर्णपणे नष्ट करून, संपूर्ण जगाला विठ्ठलरूप मानून, केवळ देह जिवंत ठेवण्यापुरते कोरडे अन्न मागण्याचा 'मधुकरी' भाव आहे. यात जगाला साकडे घालणे नाही, तर साक्षात जगदीश्वरावर पूर्ण भार टाकून अहंकार सोडून वैराग्य सपन्न होणे आहे. गुरे-वासरे सांभाळण्याची आणि त्यांच्या व्यावहारिक जतनाची कटकट संतांना उरतच नाही.
ज्याप्रमाणे आकाशात उडणारे पक्षी कधीही उद्याची चिंता करत नाहीत, ते धान्याची कोठारे भरून ठेवत नाहीत, तरीही सृष्टीचा मालक असलेला परमात्मा त्यांना रोज वेळेवर अन्न देतो आणि त्यांचे रक्षण करतो; अगदी त्याचप्रमाणे तुकोबारायांनी स्वतःच्या प्रपंचाचा सर्व साठा विठ्ठलाच्या चरणी सोपवून पक्षांसारखे मुक्त आणि आनंदी जीवन स्वीकारले आहे.
शेण-मातीचे भांडवल आणि ईश्वरी साहाय्य:
झाली सकळ निश्चिंती ।
भांडवल शेण माती ।
झळझळीत भिंती ।
वृंदावनें तुळसीचीं ॥
तुका म्हणे देवा ।
अवघा निरविला हेवा ।
कुटुंबाची सेवा ।
तोचि करी आमुच्या ॥
शेवटच्या चरणांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की, आमचे व्यावहारिक भांडवल संपले असून आता केवळ 'शेण आणि माती' उरली आहे, ज्याने आम्ही आमच्या घराच्या भिंती सुंदर आणि झळझळीत सारवून घेतल्या आहेत आणि अंगणात तुळशीचे वृंदावन निर्मळ केले आहे. आता आम्ही सर्व प्रकारे निश्चिंत झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तू आमच्या मनातील सर्व व्यावहारिक हेवा-दावा आणि वासना दूर केल्या आहेत; म्हणूनच आता आमच्या संपूर्ण कुटुंबाची आणि प्रपंचाची काळजी तूच स्वतः वाहतो आहेस!
सावकारकीच्या मोठ्या वैभवात तुकोबारायांना जी शांतता मिळाली नाही, ती विठ्ठल चरणी सर्वस्व अर्पण करून 'सदैव सुडके' होण्यात मिळाली. जेव्हा साधक आपला प्रपंच पांडुरंगाच्या चरणी संपूर्णपणे समर्पित करतो, तेव्हा देव स्वतः त्याच्या योगक्षेमाची जबाबदारी घेतो.
निष्कर्ष:
जोपर्यंत आपण वस्तूंच्या आणि संपत्तीच्या मागे धावतो, तोपर्यंत आपण चिंतेचे गुलाम असतो.
!! रामकृष्णहरी!!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.