पुणे : सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (मराठा) या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांच्या वतीने विशेष शिबिर व त्रुटी पूर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आरक्षित प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. शासनाने विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यापासून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरणे सादर केलेल्या, मात्र प्रकरणातील त्रुटींमुळे अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. २२ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दर आठवड्याला मंगळवार, बुधवार व गुरुवार या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्वतः किंवा पालकांमार्फत समितीसमोर उपस्थित राहता येईल. नियमानुसार त्रुटींची पूर्तता झालेल्या प्रकरणांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे.
अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या संबंधित विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर
त्रुटी पूर्ततेसाठी २२ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवार, बुधवार व गुरुवारी शिबिर