Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 02 August 2026

महिलांची कॅन्सरपूर्व तपासणी; किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ अभियानातून आरोग्य व स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन

वै. श्रीमती भीमाबाई गोपाळ मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डिसेंट फाउंडेशनचा स्तुत्य आरोग्य व जनजागृती उपक्रम

देहू : श्रीमती भीमाबाई गोपाळ मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने देहू येथे महिलांसाठी ‘आस्था’ कॅन्सरपूर्व तपासणी व जनजागृती अभियान तसेच किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ हा विशेष आरोग्य व जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमात महिलांसाठी स्तन, मुख व गर्भाशयाच्या कर्करोगाची पूर्वतपासणी करण्यात आली. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

याचबरोबर, डिसेंट फाउंडेशनच्या ‘कळी उमलताना’ या विशेष अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींना मानसिक व शारीरिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील आरोग्य व स्वच्छता, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनचा वापर तसेच स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, शंका व संकोच दूर करून त्यांच्यामध्ये आरोग्याबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूगाव येथील सुमारे बाराशे मुलींसाठी दोन सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनचे वितरण, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनचे वाटप तसेच ‘कळी उमलताना’ या मार्गदर्शन पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.

‘महिला निरोगी तर कुटुंब निरोगी’

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून माणुसकी, सेवाभाव आणि समाजकल्याणाचा संदेश दिला. “तुका म्हणे सुख पराविया सुखें” या विचारातून प्रेरणा घेत, दुसऱ्याच्या सुखात व कल्याणात आपले सुख मानून समाजासाठी विधायक काम करणे हीच खरी सेवा आहे, या भावनेतून डिसेंट फाउंडेशन सातत्याने आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे.

“महिला निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहते आणि आजची मुलगी निरोगी, जागरूक व आत्मविश्वासू असेल, तर उद्याचा समाज अधिक सक्षम होतो,” हा संदेश जगद्गुरुकृपांकित ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांनी यावेळी प्रवचनातून दिला.

वै. श्रीमती भीमाबाई गोपाळ मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ श्रद्धांजलीपुरता मर्यादित न राहता समाजातील महिला व मुलींच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या सामाजिक उपक्रमाला समर्पित करण्यात आला, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, डॉ. प्रियांका निकम, डॉ. किशोर यादव, उज्वला गवळी, छाया पाटील, मंदार काशीद, मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रम महाराज मोरे, नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, नगरसेवक स्वप्नील काळोखे, सपना मोरे, प्रियांका मोरे, शेखर महाराज जांभुळकर, अभिमन्यू काळोखे, प्रल्हाद आप्पा मोरे, निवृत्ती महाराज शास्त्री, संतोष महाराज काळोखे, किरीट मोरे, कांतीलाल काळोखे, रत्नमाला करंडे, अशोक मोरे, मुस्ताकभाई शेख आदी मान्यवर, ग्रामस्थ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिसेंट फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे वैद्यकीय पथक तसेच स्थानिक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाराज मोरे यांनी केले, तर आभार तुकाराम महाराजांचे वंशज श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.