सांगवी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक विद्यालय येथे मंगळवार (ता.२५ ) लष्करी जवान बांधवांसाठी ‘रक्षाबंधन कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात पार पडला.
सीमेवर अहोरात्र पहारा देऊन देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित माजी व कार्यरत फौजी बांधवांचे औक्षण करून त्यांना स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर राख्या बांधल्या, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या त्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातून स्व: कमाईचा अनुभव घेतला.
राखी बांधल्यानंतर अनेक विद्यार्थिनींना व फौजी बांधवांना गहिवरून आले. "घरच्या बहिणीपासून दूर असताना सांगवीतील या लहान बहिणींनी दिलेल्या प्रेमामुळे घराची उणीव भासली नाही," अशी भावना उपस्थित सैनिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी सैनिकांनी विद्यार्थ्यांना देशाच्या सेवेचे महत्त्व पटवून दिले . अभ्यासात सातत्य ठेवून एक चांगला नागरिक बनण्याचे आवाहन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रिया बोरकर यांनी भाषणात सांगितले की, "सैनिकांच्या असीम त्यागामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे."
या कार्यक्रमास
महाविद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले , उपप्राचार्या मेघा पोटे ,शिक्षक नंदकिशोर ढोले,वनिता गायकवाड , माधवी शेलार, मनीषा जाधव, रेखा गायकवाड , सारिका शिंदे, दिपाली सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने आणि उपस्थितांचे आभार नंदकिशोर ढोले यांनी मानले.
बाबुरावजी घोलप विद्यालयात जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा
सैनिकांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी.सौ.बोरकर