Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 14 October 2026

पुणे वर्ल्ड स्टॅंडर्ड डे २०२६ अंतर्गत बाबुरावजी घोलप विद्यालयाला ‘आदर्श BIS स्टॅंडर्ड क्लब’चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

गुणवत्ता, मानके आणि जागरूकता’ या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या बाबुरावजी घोलप विद्यालयाच्या BIS क्लबने मिळविलेला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण यश ठरला आहे.

पुणे: भारत सरकारच्या भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या वतीने वर्ल्ड स्टॅंडर्ड डे २०२६ अंतर्गत आयोजित पुरस्कार सोहळ्यात सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयात सन २०२२ पासून कार्यरत असलेल्या BIS क्लबला उत्कृष्ट कार्याबद्दल ‘आदर्श BIS स्टॅंडर्ड क्लब’ या पुरस्काराने प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
पुणे येथील लेमन ट्री हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात BIS क्लबचे मेंटर संजय मेमाणे यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान करून विद्यालयाचा गौरव करण्यात आला. BIS क्लबचे दिल्ली येथील प्रमुख श्री.कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास BIS चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.विद्यालयातील BIS क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय मानके, गुणवत्तापूर्ण उत्पादने, ग्राहक जागरूकता आणि मानकांचे महत्त्व यांविषयी सातत्याने जनजागृती करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या गुणवत्तेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मानकांविषयी ज्ञान वाढविणे या उद्देशाने क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत विद्यालयाला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे आणि मानद सचिव ॲड. संदीप कदम , उपसचिव एल. एम. पवार , खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख , सहसचिव आत्माराम जाधव , मूल्यमापन अधिकारी व अधिक्षक किरण देशपांडे या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच विद्यालयाला हे यश संपादन करता आले, अशी भावना विद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तसेच BIS पुणे विभागाचे प्रोग्राम मॅनेजर हर्षमोहन शुक्ला यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयातील BIS क्लब सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
या पुरस्कारामुळे बाबुरावजी घोलप विद्यालयाच्या शैक्षणिक आणि उपक्रमशील कार्याचा गौरव झाला असून, विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले, उपप्राचार्या मेघा पोटे, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे, BIS क्लबचे मेंटर संजय मेमाणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.