देहू : दिवाळी आणि भाऊबीज हा नात्यांमधील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा सण आहे. मात्र समाजातील अनेक माता-भगिनींना भाऊ, माहेर किंवा आप्तस्वकीय नसल्याने भाऊबीजेचा आनंद अनुभवता येत नाही. अशा वंचित भगिनींच्या आयुष्यात माहेरच्या प्रेमाची ऊब निर्माण करण्यासाठी ‘माहेरची साडी’ हा संवेदनशील उपक्रम राबविण्यात येत आहे.
अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने सुमारे १७ वर्षांपूर्वी ‘माहेरची साडी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते स्व. धर्मराज शंकर औटी गुरुजी यांच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नांतून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी आणि वंचित समूहातील महिलांना भाऊबीजेच्या निमित्ताने साडी देऊन त्यांच्याप्रती आपुलकी व्यक्त केली जाते.
स्व. औटी गुरुजी आज आपल्यात नसले तरी त्यांनी सुरू केलेली ही माणुसकीची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांनी केला आहे.
यंदाही स्नेहालय परिवार आणि अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊबीजेनिमित्त वंचित समूहातील माता-भगिनींना ‘माहेरची साडी’ देण्यात येणार आहे.
या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या क्षमतेनुसार साडी देऊन एखाद्या भगिनीच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा, तसेच मित्रपरिवार, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“आपली एक साडी एखाद्या भगिनीसाठी केवळ वस्त्र नसून माहेरची आठवण, भावाचे प्रेम आणि आपण एकटे नाही याची जाणीव ठरू शकते,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
भाऊबीजेला एका साडीच्या रूपाने माणुसकीची ऊब देऊन वंचित भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवूया, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहेरची साडी वंचित माता-भगिनींच्या आयुष्यात फुलवणार माहेरच्या प्रेमाची ऊब
आपल्या क्षमतेनुसार साडी देऊन एखाद्या भगिनीच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा, तसेच मित्रपरिवार, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अभंग प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.