जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या एम.डी.पी. 19 October 2026

देहू कन्या विद्यालयात शिवकालीन युद्धकला व महिला स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक

शिवकालीन युद्धकलेतून विद्यार्थिनींना इतिहासाची आठवण; महिला सबलीकरणाचा संदेश

देहू : संत जिजाबाई कन्या विद्यालय येथे रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत शिवकालीन युद्धकला, महिला स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन या उद्देशाने युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण व सांस्कृतिक संवर्धन संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच शस्त्रपूजनाने झाली.
या वेळी संस्थेचे प्रमुख बाबासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी, दानपट्टा, भाला, तलवारबाजी, खंदा आणि कलरी पट्टा यांसारख्या पारंपरिक युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सोहम दिघे, अथर्व गायकवाड, समर्थ टेकाळे, श्रद्धा मिश्रा, जानवी येळवंडे आणि गौरी मिश्रा यांनी विविध युद्धकलांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थिनींचे लक्ष वेधून घेतले.
या प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थिनींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धपरंपरा, शौर्य आणि पराक्रमाची माहिती मिळाली. तसेच महिलांनी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करून आत्मविश्वासाने जीवन जगावे, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. शिवकालीन युद्धकलेचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वही या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मनीषा निकम, संत तुकाराम विद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्वालेहा पठाण आणि श्रीकांत मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख शिवराज तांबे, महिपत मोरे, विनोद वीरनक, नारायण बांगर, विक्रम काळे आणि स्वाती घिगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घुमटकर यांनी केले, तर चंद्रकांत मगर यांनी आभार मानले.