जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 29 September 2026

देहूकरांना वीज वितरण कंपनीचा रोजचा ‘शॉक’!

पहाटेपासून वीज खंडित; हजारो ग्राहकांच्या तक्रारी, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्याची मागणी

देहू: देहू शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला असला, तरी या वाढत्या शहरीकरणाबरोबर नागरिकांच्या समस्याही वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा देहूकरांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे. दररोज पहाटेपासूनच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे.
देहूतील नागरिकांच्या वीज समस्यांसाठी एका स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक हजारांहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. वीज गेल्यानंतर नागरिक या ग्रुपवर आपल्या भागातील तक्रारी नोंदवतात. काही नागरिक आपल्या घरातील समस्या मांडतात, तर काही जण वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे देहूतील वीज प्रश्नाचे गांभीर्य या ग्रुपवरील रोजच्या तक्रारींमधूनही दिसून येत आहे.
पाच वर्षांत देहूचा झपाट्याने विस्तार
काही वर्षांपूर्वी देहूमध्ये साडेतीन ते चार हजारांच्या आसपास मिळकती असल्याचे सांगितले जात होते. सन २०२१ मध्ये देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहराचा विस्तार अधिक वेगाने झाला. इंद्रायणी नदीमुळे उपलब्ध असलेले पाणी, तीर्थक्षेत्र म्हणून असलेले महत्त्व आणि वर्षभर होणारी भाविकांची वर्दळ यामुळे देहू परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गृहप्रकल्पांसाठी दिल्या, तर काही ठिकाणी शेतजमिनींवर गोदामे उभी राहिली. या गोदामांमध्ये लघुउद्योग व विविध व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे परिसरातील आर्थिक व्यवहार वाढले आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.
नगरपंचायतीच्या नोंदीनुसार मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, लोकसंख्याही ५० हजारांच्या पुढे गेल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा कितपत सक्षम झाल्या आहेत, हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विकासाबरोबर समस्याही वाढल्या
गृहप्रकल्प, व्यावसायिक आस्थापना आणि लघुउद्योग वाढल्याने देहूचा चेहरामोहरा बदलला. मात्र त्याचबरोबर वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा यांसारख्या समस्या पुढे आल्या आहेत.
विशेषतः गावठाण, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि जुन्या वस्तीच्या भागातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्येला अधिक सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. जुन्या वीजवाहिन्या, खांब, तारा आणि वाढलेला वीजभार यामुळे काही ठिकाणी वारंवार बिघाड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एका गाडीवर तेरा कर्मचारी; तक्रारींच्या निवारणासाठी धावपळ
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संबंधित भागात पोहोचून बिघाड शोधण्याचा प्रयत्न करतात. ट्रान्सफॉर्मरचा बिघाड, भूमिगत केबलमध्ये समस्या, फॉल्ट सापडत नसणे अशा विविध कारणांमुळे दुरुस्तीला वेळ लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
एका बाजूला नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला उपलब्ध मनुष्यबळावरच वीज वितरण कंपनीला संपूर्ण देहू परिसरातील बिघाड हाताळावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढत्या देहूसाठी वीज वितरण कंपनीने कर्मचारी संख्या आणि तांत्रिक यंत्रणा वाढवावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
नवीन सबस्टेशनची चर्चा; मात्र नागरिकांचा प्रश्न कायम
देहू परिसरातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून नवीन सबस्टेशनला शासनाची मान्यता मिळाल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू होईल आणि निविदा प्रक्रियाही झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र प्रस्तावित सबस्टेशनचा फायदा नेमका कोणत्या भागाला आणि कशा पद्धतीने होणार, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न आहेत. वाढत्या गृहप्रकल्पांना आणि व्यावसायिक वापराला वीजपुरवठा देताना जुन्या देहूतील नागरिकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होणार नाही ना, याची स्पष्टता आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘नवीन प्रकल्पांना वीज, मग जुन्या देहूकरांचे काय?’
देहूमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. भविष्यात आणखी मोठ्या प्रकल्पांमुळे वीजेची मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्पांना स्वतंत्र वीजपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देताना जुन्या गावठाणातील, माळवाडी आणि विठ्ठलवाडीतील ग्राहकांना नियमित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
देहूची भौगोलिक रचना, वाढती लोकसंख्या, वाढलेले गृहप्रकल्प, व्यावसायिक आस्थापना आणि तीर्थक्षेत्र म्हणून वर्षभर होणारी गर्दी यांचा एकत्रित विचार करून वीज वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘आज तक्रारी व्हॉट्सॲपवर; उद्या आंदोलनाची वेळ येऊ नये’
दररोज वीजपुरवठा खंडित होणे, त्यानंतर नागरिकांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर तक्रारी नोंदवणे आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त करण्यासाठी धावपळ करणे, हे चक्र आता थांबण्याची गरज आहे.
देहूची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वीज मागणी लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देहूतील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी नवीन वाहिन्या, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, भूमिगत केबल, कर्मचारी संख्या आणि इतर तांत्रिक सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या नाहीत, तर भविष्यात नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन किंवा मोर्चाचा मार्ग स्वीकारावा लागू नये, यासाठी प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने आतापासूनच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
देहूचा विकास वेगाने होत आहे; आता त्या विकासाला सक्षम वीज वितरण व्यवस्थेची जोड मिळणार का, याकडे देहूकरांचे लक्ष लागले आहे.