जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 14 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

संसाराच्या चक्रात होरपळणाऱ्या अशांत मनाला संतांच्या सान्निध्यात आले की कायमची 'विश्रांती' म्हणजेच परम शांती लाभते

देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ६२
शुद्ध बीजापोटीं ।फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी ।देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांग निर्मळ ।चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती ।ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
_______________________
"शुद्ध बीजापोटीं ।
फळें रसाळ गोमटीं ॥
जर जमिनीमध्ये पेरायचे बीज उत्तम, निरोगी आणि शुद्ध असेल, तर त्यापासून उगवणाऱ्या वृक्षाला लागणारी फळेही नेहमी रसाळ, गोड आणि टवटवीतच येतात. हाच नियम मानवी जीवनालाही लागू होतो. ज्याचे कुळ, घराणे आणि संस्कार शुद्ध असतात, त्यांच्या जीवनातून भक्तीची रसाळ फळे प्रकट होतात. अशा मनुष्याच्या मुखातून नेहमी अमृतासारखी मधुर वाणी बाहेर पडते आणि त्यांचा संपूर्ण देह स्वतःच्या स्वार्थासाठी नसून भगवंताच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी (देवाचे कारणी) सत्कारणी लागतो.
'बीज, शुद्ध आणि गुणवान असेल, तरच त्यापासून येणारे पीक किंवा फळ उत्तम दर्जाचे राहते. संतांचे अंतःकरण आणि त्यांचे विचार हे संस्कारांच्या पातळीवर इतके शुद्ध बियाण्यासारखे असतात, की त्यांच्याद्वारे होणारे समाजप्रबोधन जगाचा उद्धार करते.
श्रीमद्भागवत पुराणाचा दाखला:
या सिद्धांताची अतिशय सुंदर साक्ष आपले भागवत पुराण देते. भागवतात
बाल ध्रुवाची कथा:
ध्रुव बाळाची माता 'सुनीती' हिचे विचार, तिचे कुळ आणि तिचे मन इतके पवित्र होते (शुद्ध बीज), की जेव्हा पाच वर्षांचा ध्रुव रडत तिच्याकडे आला, तेव्हा तिने त्याला संसाराचा मार्ग न दाखवता थेट भगवंताच्या भक्तीचा मार्ग दाखवला. मातेच्या या शुद्ध संस्कारांच्या बियाणामुळेच अवघ्या पाच वर्षांच्या ध्रुव बाळाने जंगलात कठोर तपश्चर्या करून साक्षात नारायण प्रसन्न करून घेतले.
"सर्वांग निर्मळ ।
चित्त जैसें गंगाजळ ॥
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की, संतांचे केवळ बाह्य वर्तनच स्वच्छ नसते, तर त्यांचे देह, चित्त आणि बुद्धी हे आतून आणि बाहेरून पूर्णपणे निर्मळ असतात. त्यांचे चित्त हे पवित्र 'गंगाजलासारखे' स्वच्छ असते. गंगेचे पाणी जसे स्वतः वाहत जाऊन जगाची घाण, पाप धुवून काढते आणि स्वतः मात्र पवित्रच राहते; तसेच संतांचे मन जगातील विकार दूर करते आणि सर्वांना आपल्या भक्तीच्या प्रवाहात पावन करते.
संत ज्ञानेश्वर माउली सुद्धा ज्ञानेश्वरीत संतांच्या या निर्मळ आणि पवित्र रूपाचे वर्णन करतात.
"चंद्रमे जे अलांछन ।
मार्तंड जे तापहीन ॥"
संत म्हणजे डाग नसलेला पावन चंद्र आणि लोकांना पोळण्याऐवजी सुखद प्रकाश देणारा सूर्य आहेत.
"तुका म्हणे जाती ।
ताप दर्शनें विश्रांती ।।"
परमपवित्र, शुद्ध चित्ताच्या संतांच्या केवळ 'दर्शनाने' माणसाचे त्रिविध ताप
(आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक त्रास अथवा सर्व मानसिक चिंता)हे त्रिविध ताप नष्ट होतात. संसाराच्या चक्रात होरपळणाऱ्या अशांत मनाला संतांच्या सान्निध्यात आले की कायमची 'विश्रांती' म्हणजेच परम शांती लाभते.
!! रामकृष्णहरी !!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्रीक्षेत्र देहू .