जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 02 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

जगातील लोकांच्या प्रतिक्रियांवर आपले सुख-दुःख अवलंबून ठेवू नका. स्तुतीने हुरळून न जाणे आणि निंदेने खचून न जाणे.

देहू:
निंदी कोणी मारी ।
वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हें ही नाहीं तें ही नाहीं।
वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥
देहभोग भोगें घडे ।
जें जें जोडे तें बरें ॥२॥
अवघें पावे नारायणीं ।
जनार्दनीं तुकयांचें ॥३॥
______________________
।। श्री तुकोबराय चैतन्य ।।
______________________
संसारात राहूनही संसाराच्या सुख-दुःखापासून, मानापानापासून कसे अलिप्त राहावे, याचे गुपित तुकाराम महाराजांनी येथे उलगडले आहे. हा अभंग साधकाला 'स्थितप्रज्ञ' अवस्थेची ओळख करून देतो.
द्वंद्वांच्या पलीकडील अलिप्तता:
निंदी कोणी मारी ।
वंदी कोणी पूजा करी ॥
"मज हें ही नाहीं तें ही नाहीं ।
वेगळा दोहीं पासुनी ॥"
लौकिक जगात माणसाला कुणी निंदा केली किंवा मारले तर अतीव दुःख होते, आणि कुणी वंदन केले, पूजा केली (स्तुती केली) तर उर भरून येतो. पण महाराजांची अवस्था या दोन्हीच्या पलीकडे गेली आहे. ते म्हणतात, मला निंदेचे दुःख नाही आणि पूजेचा आनंदही नाही. मी या दोन्ही मानवी भावनांपासून आणि द्वंदवांपासून पूर्णपणे 'वेगळा' म्हणजेच अलिप्त झालो आहे. कारण त्यांनी स्वतःची ओळख या नश्वर देहाशी न ठेवता शाश्वत आत्म्याशी जोडली आहे.
प्रारब्धाचा आणि देहभोगाचा सहज स्वीकार:
प्रपंचात जगण्याचा मंत्र :
"देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥"
हा देह जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत पूर्वसंचितानुसार (प्रारब्धामुळे) त्याला सुख किंवा दुःख भोगावेच लागणार आहे. त्याला टाळता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, माझ्या देहाच्या वाट्याला प्रारब्धाने जे काही येईल—मग ते वैभव असो वा दारिद्र्य, सुख असो वा दुःख— 'जें जें जोडे' ते बरे (जे जे समोर येईल) त्याचे मी 'बरें' म्हणून म्हणजेच समभावाने आणि आनंदाने स्वागत करीन. जसे
चंदनाच्या झाडाला कुणी कुऱ्हाडीने तोडो (देहपीडा किंवा संकट) अथवा कुणी त्याची मनोभावे पूजा करो (वैभव किंवा मान), चंदन वृक्ष तोडणाऱ्यालाही सुवास देतो आणि पूजा करणाऱ्यालाही सुगंधच देतो. देहभोगाने समोर काहीही आले, तरी तो आपल्या मूळ आनंदी स्वभावापासून ढळत नाही.
तसेच संतांचे अंतःकरणही आपल्या देहावर येणाऱ्या अनुकूल-प्रतिकूल प्रारब्ध भोगांना याच समत्वाने स्वीकारते.
सर्वस्व नारायणी अर्पण:
अवघें पावे नारायणीं। जनार्दनीं तुकयांचें॥
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या देहाला मिळणारे सुख-दुःख, मान-अपमान हे सर्व मी स्वतःकडे न घेता त्या 'नारायणाच्या' (परमेश्वराच्या) चरणी अर्पण केले आहे.
जनार्दन म्हणजे सर्व भूतमात्रांमध्ये वास करणारा परमात्मा; तुकाराम महाराज म्हणतात, माझे संपूर्ण अस्तित्वच आता त्या जनार्दनाशी, विठ्ठलाशी एकरूप झाले आहे. जेव्हा सर्व काही देवाचेच होते, तेव्हा स्वतःकडे भोग घ्यायला 'मी' पणा उरतच नाही.
बोध:
जगातील लोकांच्या प्रतिक्रियांवर आपले सुख-दुःख अवलंबून ठेवू नका. स्तुतीने हुरळून न जाणे आणि निंदेने खचून न जाणे, तसेच जीवनात देहभोगामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा 'प्रसाद' म्हणून स्वीकार करणे, हाच परमार्थाचा खरा मार्ग आहे.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान,
श्री क्षेत्र देहू.