अभंग क्रमांक: ४३
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं॥१॥
मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥
जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥3!!
_____________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
______________________
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगात श्री पांडुरंगाला संपूर्णपणे शरणागत होऊन कर्माच्या कठीण पाशातून (फेऱ्यातून) सोडवण्याची आर्त हाक मारत आहेत. जेव्हा जीव भगवंताचा आश्रय घेतो, तेव्हा त्याचे पाप-पुण्य आणि जीवनाचा सर्व भार स्वतः परमात्मा कसा उचलतो, याचे सुंदर वर्णन यात केले आहे.
सृष्टीतील प्रत्येक जीवजंतू, पशुपक्षी आणि मनुष्याने ज्या योनीत जन्म घेतला, तिथे त्याने आपल्या 'स्वधर्माचे' (कर्तव्याचे) पालन करावे हा सृष्टिचा नियम आहे आणि हाच खरा धर्म आहे.
आपण जे काही कर्म करतो, त्या कर्माच्या पाठीमागे असणारे 'पाप आणि पुण्य' ठरवण्याचा न्याय पूर्णपणे परमेश्वरच्या हातात आहे. म्हणून आपण आपले प्रत्येक नित्यकर्म ईश्वराला साक्षी ठेवूनच केले पाहिजे.
कर्माच्या कठीण पाशातून मुक्ती (मज सोडवीं दातारा):
संसारात माणसाकडून कळत-नकळत अनेक कर्मे घडतात आणि माणूस कर्माच्या चक्रात अडकतो. हे कर्माचे जाळे एवढे 'दुस्तर' (पार करायला कठीण) आहे की, माणूस स्वतःच्या बळावर यातून सुटू शकत नाही. रिद्धी-सिद्धीच्या सामर्थ्याने सोन्याचे पर्वत किंवा रानोरान कल्पतरू जरी मिळाले, तरी अशा स्वर्गीय सुखांमुळे जीव देवाच्या चरणांपासून दुरावतो.
म्हणूनच श्रीतुकोबाराय म्हणतात, हे दातारा! मला या ऐहिक सुखाच्या आणि कर्माच्या कठीण बंधनातून तूच सोडव.
भगवंताचा अंगीकार:
संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला! जर तू माझा 'अंगीकार' केलास (मला तुझा म्हणून स्वीकारलेस), तर माझ्या कर्माचा किंवा पापांचा 'भार' माझ्यावर राहणारच नाही.
जीवन चरित्र:
तुकाराम महाराजांनी, सुखी संसार थाटला. पण दुष्काळात सर्व काही गमावले. त्यांच्यावर संसाराचा आणि कर्माचा मोठा भार होता. पण ज्या दिवशी त्यांनी सर्व भार पंढरीच्या विठ्ठलावर सोडून दिला आणि स्वतःला भगवंताच्या चरणी वाहून घेतले, त्या दिवसापासून पांडुरंग स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मंबाजी बुवांनी छळले काय किंवा रामेश्वर भटांनी गाथा बुडवल्या काय, विठ्ठलाने त्यांचा प्रत्येक 'भार' स्वतःच्या अंगावर झेलला आणि गाथा पाण्यावर तरंगवून महाराजांचा अंगीकार सिद्ध केला.
जिवींचा जीवन:
ईश्वर:सर्वभूतानां
तुकोबाराय शेवटी म्हणतात, हे नारायणा! तू सर्वत्र आहेस केवळ जगाचा मालक नाहीस, तर तू माझ्या 'जिवींचा जीवन' (माझ्या प्राणाचा प्राण) आहेस. तू सर्वांचे मनोरथ पूर्ण करतोस, तशी माझीही तुझ्या चरणांशी अनन्य राहण्याची इच्छा पूर्ण कर.
आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म अहंकार बाजूला ठेवून, भगवंताला स्मरून करावे. जेव्हा आपण आपले सुख-दुःख आणि कर्म विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून त्याला शरण जातो, तेव्हा आपल्या आयुष्याची सर्व जबाबदारी पांडुरंग स्वतः उचलतो.
रामकृष्णहरी!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू.
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
आपण जे काही कर्म करतो, त्या कर्माच्या पाठीमागे असणारे 'पाप आणि पुण्य' ठरवण्याचा न्याय पूर्णपणे परमेश्वरच्या हातात