देहू : रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, देहू यांच्या वतीने देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी देशाच्या जवानांसाठी’ हा उपक्रम मंगळवारी (ता.25)येथे राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनींकडून विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार करून घेण्यात आल्या. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने व देशप्रेमाच्या भावनेने या राख्या तयार केल्या.
त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थिनींनी जवानांच्या हातावर या राख्या बांधल्या. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अनोखा उपक्रम ठरला.
राखी बांधण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनींसोबत शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी थोरवे, शिक्षिका पूनम मोरे, शोभा खरात, वैजयंता हांडे, जयश्री धनगर, प्रतिभा गायकवाड, अश्विनी ढवणे व शीतल जाधव या उपस्थित होत्या. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून धनश्री खराडे उपस्थित होत्या.
राखी बांधतानाचा क्षण अत्यंत भावनिक ठरला. विद्यार्थिनींनी प्रेमाने जवानांच्या हातावर राखी बांधल्यानंतर अनेक जवान भावुक झाले. काही जवानांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. देशाच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या जवानांसाठी विद्यार्थिनींनी व्यक्त केलेले प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा क्षण उपस्थित सर्वांसाठी हृदयस्पर्शी ठरला.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि जवानांच्या त्यागाची जाणीव निर्माण झाली. जवानांच्या हातावर राखी बांधण्याचा हा अनुभव विद्यार्थिनींसाठी अभिमानाचा आणि अविस्मरणीय ठरला.
मुख्याध्यापिका रुक्मिणी थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थिनी व पालक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
देहू न्यू इंग्लिश स्कूल तर्फे ‘एक राखी देशाच्या जवानांसाठी’ उपक्रम
जवानांना राखी बांधून विद्यार्थिनींनी व्यक्त केली कृतज्ञता. स्वतःच्या हाताने राखी तयार करून विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला.