पुणे : परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी( ता. 18) केले.
श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मीरा सुरेश कलमाडी आदी उपस्थित होते.
यावेळी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुणे फेस्टिव्हलच्या सातत्यपूर्ण आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या योगदानाचेही स्मरण केले.
पुणे फेस्टिव्हलची समृद्ध परंपरा जपण्यासाठी सर्व सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री
पुणे फेस्टिव्हलच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, गायन, वादन, नृत्य, शास्त्रीय संगीत, लोककला, नाट्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना या महोत्सवाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मोठ्या कलाकारांसोबत नवोदित कलाकारांना संधी देणे, महिला महोत्सव, लावणी महोत्सव, चित्रकला, नृत्य, पाककला, मेहंदी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग हे पुणे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्याची संस्कृती आता पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून जगाशी संवाद साधणारा हा महोत्सव सांस्कृतिक दुवा ठरत आहे, असे सांगून या महोत्सवासाठी शासनाच्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पुणे ही केवळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नसून विचार, शिक्षण, साहित्य, संगीत, नाटक, कला, क्रीडा आणि सामाजिक चळवळींची समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. त्यामुळे पुण्याच्या भूमीवर होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला विशेष महत्त्व आहे. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून पुण्याची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि पुणेकरांच्या उत्साहाचा उत्सव आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे फेस्टिव्हल' देशाची सांस्कृतिक ओळख जगासमोर नेणारे महत्त्वाचे व्यासपीठ-आशिष शेलार
पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाला शुभेच्छा देताना श्री. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय आणि देश-विदेशात त्याचे आयोजन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षमतांचा विस्तार आहे. ‘वारसा ते विकास’ या संकल्पनेतून वारसा, परंपरा आणि विकास यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. पुणे फेस्टिव्हल हे महाराष्ट्राची आणि देशाची सांस्कृतिक ओळख जगासमोर नेणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही श्री. शेलार यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जागतिक पातळीवर दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करतांना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विविध भागांतील भाषा, लोककला, नृत्य, पाककला आणि परंपरांमधील वैविध्य हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून हे सांस्कृतिक वैभव सातत्याने जगासमोर येत आहे.
पुणे फेस्टिवलच्या चेअरमन मीरा कलमाडी यांनी आपल्या प्रास्ताविकात पुणे फेस्टिवलच्या ३८ वर्षांची वाटचाल विशद केली.
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
पुणे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान