पुणे : तब्बल १०० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या दि मिल्ट्री इंजीनियरिंग सर्विसेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ने आपल्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला आहे. संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तीन लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी (ता. 31) सुपूर्द केला.
२५ जानेवारी १९२६ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने १०० वर्षांचा यशस्वी आणि गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. शताब्दी वर्षात संस्थेने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत मुख्यमंत्री सहायता निधीस मदत दिली.
समाजातील गरजू नागरिकांना आधार मिळावा, तसेच नैसर्गिक आपत्ती व संकटाच्या काळात शासनाच्या मदतकार्यात हातभार लागावा, या सेवाभावी भावनेतून संस्थेने हा उपक्रम राबविला.
यावेळी संस्थेचे सचिव राजेश टिळेकर, संयुक्त सचिव शेखर वेव्हारे, मुंबई शाखा सचिव संतोष आरख, संचालक ललित पुंडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. टोंडे उपस्थित होते.
शंभर वर्षांच्या विश्वास, सेवा आणि सहकाराच्या प्रवासात सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवत संस्थेने शताब्दी वर्षाची सुरुवात एका अर्थपूर्ण समाजोपयोगी उपक्रमाने केली आहे, असे सचिव राजेश टिळेकर यांनी सांगितले.
मिल्ट्री इंजीनियरिंग सर्व्हिसेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाखांची मदत
शताब्दी वर्षात एम. ई .एस. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा समाजसेवेचा आदर्श; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाखांची मदत.