जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या एम.डी.पी. 09 October 2026

आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात मावळ तालुका भाजप च्या वतीने निषेध मोर्चा

आमदारांच्या निषेधार्थ मोर्चा निघतो हा मावळच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस आहे. विचार व संस्कार ही मावळची परंपरा राहिली आहे- बाळा भेगडे

वडगाव मावळ: मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता.8 )येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून काढण्यात आलेल्या या मोर्चात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जेष्ठ नेते माऊली शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, अतिश परदेशी,
उद्योजक रणजीत काकडे, माजी नगराध्यक्ष ॲड.रविंद्रनाथ दाभाडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे,
माजी उपसभापती शांताराम कदम, सचिन घोटकुले, सुभाष जाधव, प्रशांत भागवत, भाऊ गुंड, श्रीधर पुजारी, रघुवीर शेलार, बाळासाहेब घोटकुले, अनिरुद्ध काळोखे आदींसह कार्यकर्ता के सन्मान मे, भाजपा मैदान मे अशी घोषणा देत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता. हातात आमदार शेळके यांच्या निषेधाचे फलक घेत व त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
तेथे अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून आमदार शेळके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. माजी उपसभापती शांताराम कदम म्हणाले, आमदारांनी गेल्या सात वर्षात जनतेची सेवा करायची सोडून भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले आहे. भाजप संपवण्याची भाषा ते करत आहेत. मात्र यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. उद्योजक रणजीत काकडे म्हणाले , तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्याऐवजी आमदार शेळके भाजपला बदनाम करण्याचे काम करत आहेत. संविधानिक पदाचा गैरवापर केला आहे. आमचा संयम म्हणजे आमची कमजोरी समजू नका ,असा इशाराही त्यांनी दिला.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी आमदार शेळके यांच्यावर सडकून टीका केली.
गणेश भेगडे म्हणाले, भाजपचा विकास कामांना नेहमीच पाठिंबा राहिला आहे. मात्र आमदार शेळके यांनी वस्तुस्थिती समजून न घेता बेताल वक्तव्य केले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, आमदारांच्या निषेधार्थ मोर्चा निघतो हा मावळच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस आहे. विचार व संस्कार ही मावळची परंपरा राहिली आहे. मात्र आमदार सत्तेच्या छताखाली राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. यापुढे कार्यकर्ते हा त्रास खपवून घेणार नाहीत. तालुक्यात योजनांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या एसआयटी चौकशीची गरज आहे.
रविंद्र भेगडे यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या झालेल्या अवमानाबद्दल आमदार शेळके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. रघुवीर शेलार म्हणाले, सोमाटणे फाटा ते देहू रोड पर्यंत वेश्याव्यवसाय आमदारांना दिसतो. आमदारांसोबत पोलीस असताना त्यांनी गाडी थांबून हा व्यवसाय का थांबवला नाही. यापुढे मावळातील सर्व अवैद्य धंदे बंद करण्यात येतील .आम्ही ते चालू देणार नाही.
कैलास पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. रामदास गाडे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर यांनी आभार मानले.