जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या एम.डी.पी. 16 October 2026

देहूच्या कचरा डेपोत मध्यरात्री बाहेरगावचा कचरा टाकून जाळणारा इसम पकडला

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची कारवाई; देहूरोड पोलिसांच्या ताब्यात, नगरपंचायतीकडून तक्रार दाखल

देहू : देहू नगरपंचायत हद्दीतील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देहूबाहेरील नागरिकांकडून रात्रीच्या वेळी डेपो परिसरात कचरा टाकून तो जाळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास कचरा टाकणाऱ्या एका इसमाला देहू-देहूरोड भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर देहू नगरपंचायतीच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.
दहा दिवसांत उपाययोजना करण्याची मागणी:
देहू येथील कचरा डेपोवरील अयोग्य व्यवस्थापन, कचरा जाळण्याचे प्रकार आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका याबाबत भाजप युवा मोर्चाच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाद्वारे कचरा डेपो परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, संपूर्ण परिसराला संरक्षक कंपाऊंड घालणे आणि कचरा मुख्य रस्त्यापासून दूर टाकण्याची व्यवस्था करणे, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या मागण्यांवर ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मध्यरात्रीच्या कारवाईने प्रकार उघड:
दि. १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बाहेरगावाहून आलेल्या वाहनातून कचरा टाकला जात असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कचरा टाकून तो पेटविण्यात आल्याचे निदर्शनास आले. कार्यकर्त्यांनी संबंधित इसमाला पकडून देहू नगरपंचायतीचे कर्मचारी आणि देहूरोड पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर संबंधित इसमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच अग्निशमन वाहनाच्या मदतीने जळणारा कचरा विझविण्यात आला.
या कारवाईच्या वेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, उपाध्यक्ष सचिन मराठे, दुर्गेश भालेराव आणि देहू नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी आंदोलनाचा इशारा:
कचरा जाळल्यामुळे परिसरात धूर पसरत असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कचरा डेपोमध्ये बाहेरगावचा कचरा टाकणाऱ्या आणि तो जाळणाऱ्यांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कचरा डेपोला सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि संरक्षक कंपाऊंड उपलब्ध करून देण्यासह कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आता या प्रकरणी पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते आणि नगरपंचायत प्रशासन कचरा डेपोच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना करते, याकडे देहूकरांचे लक्ष लागले आहे.